नवी दिल्ली: ईस्टर्न एक्स्प्रेस वेच्या उद्गाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसेल, तर 1 जूनपासून हा मार्ग जनतेसाठी खुला करा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला.

ईस्टर्न एक्स्प्रेस वे तयार असूनही केवळ उद्घाटनाअभावी त्याचं लोकार्पण रखडलं आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी वर्तवली.

जर महिनाभरात या मार्गाचं उद्घाटन झालं नाही, तर 1 जूनपासून तो जनतेसाठी खुला करा, असा आदेश कोर्टाने दिला.

याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने, मेघालय कोर्टाचाही दाखला दिला. मेघालय कोर्ट गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे, मात्र आजपर्यंत त्याचं उद्घाटनच झालं नाही. पण कोर्टाचं काम थांबलं नाही, असं कोर्टाने सांगितलं.

ईस्टर्न एक्स्प्रेस वे 135 किमी लांबीचा आहे. या उद्गाटनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पंतप्रधानांची वेळ मागितली आहे. तशी माहिती प्राधिकरणाने कोर्टात दिली.

मात्र कोर्टाने तीव्र नाराजी वर्तवत, पंतप्रधानांना वेळ नसेल, तर तुम्ही उद्घाटन का करत नाही? मेहनत तर तुमचीच आहे, असं म्हटलं.

कुंडली वरुन पलवलपर्यंत गाझियाबादमार्गे जाणारा ईस्टर्न एक्स्प्रेस वे 135 किमी लांब आहे. या मार्गावरुन प्रवास केल्याने, वेळ आणि अंतर वाचणार आहे.

या रस्त्यामुळे एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत सहज पोहोचता येणार आहे. गेल्या महिन्यात 29 एप्रिलला या मार्गाचं उद्घाटन होणार होतं, मात्र ते अजूनही झालं नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे रोजी भारतातील पहिल्या 14 लेन दिल्ली मेरठ एक्स्प्रे वेचं उद्घाटन करणार आहेत.