ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिघे बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. तर डॅरेन लिमन यांना या षडयंत्राची कल्पना नसल्याचं आढळल्यामुळे ते प्रशिक्षकपदी कायम राहणार आहेत.
स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट ऐवजी मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स यांची जोहान्सबर्गमधील चौथ्या कसोटीसाठी संघात वर्णी लागली आहे. टिम पेनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांना तातडीने ऑस्ट्रेलियाला बोलावण्यात आलं आहे.
पुढील 24 तासांमध्ये तिघा दोषी खेळाडूंना शिक्षा सुनावली जाणार आहे. खिलाडूवृत्तीचा देश ही ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळल्याच्या भावना सदरलँड यांनी व्यक्त केल्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफी त्यांनी पत्रकार परिषदेत मागितली.
काय आहे प्रकरण?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (तिसऱ्या) केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर स्मिथनं याची कबुलीही देताना हा रणनीतीचाच एक भाग होता, असं मान्य केलं होतं.
बॅनक्रॉफ्टचं चेंडू अवैधरित्या हाताळणं कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या चांगलंच अंगाशी आलं. स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर कर्णधार स्मिथ आपल्या पदावरुन पायउतार झाला, तर डेव्हिड वॉर्नरनेही उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला.
आयसीसीनं स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आहे आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली आहे. तर बॅनक्रॉफ्टला 75 टक्के दंड ठोठावला असून तीन डिमेरीट्स पॉईंट देण्यात आले आहेत.
बॉल टॅम्परिंग म्हणजे काय?
बॉल टॅम्परिंग या क्रिकेटिंग टर्मचा मराठीत चेंडू अवैधरित्या हाताळणं असा सोपा अनुवाद आपल्याला करता येईल. पण चेंडू अवैधरित्या हाताळणं यात अनेक गैरप्रकारांचा समावेश होतो.
माती, बाटलीच्या झाकणाने किंवा कोणत्याही वस्तूनं चेंडू जाणीवपूर्वक घासणं, चेंडूची शिवण दातांनी किंवा नखांनी उसवणं, चेंडूवर दातांनी किंवा नखांनी ओरखडे पाडणं, मिंट किंवा च्युईंग गम चघळून तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेनं किंवा व्हॅसेलिनसारखे पदार्थ लावून चेंडूच्या एका बाजूची लकाकी राखणं या साऱ्या बाबी बॉल टॅम्परिंगमध्ये मोडतात.
संबंधित बातम्या :