पुणे : पुणेकरांनो, यापुढे तुम्हाला कुत्री, मांजरी, ससा, पोपट, खार असे कोणतेही पाळीव प्राणी पाळायचे असल्यास महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी किती आणि कोणते पा‌ळीव प्राणी पाळावेत, याची नियमावली आणि धोरण तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.


पाळीव प्राण्यांमुळे होणारी भांडणं पुणेकरांसाठी नवीन नाहीत. त्यामुळे अशा वादांवर तोडगा म्हणून पालिकेनं स्वतंत्र धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे सत्ताधारी भाजप नियमावली तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे भाजपमधील काही नेत्यांनी मात्र या नव्या धोरणाला विरोध केला आहे. त्याच वेळी प्राणीप्रेमी मात्र व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन नको, अशी मागणी करत आहेत.

विशेष म्हणजे विरोधकांनीही महापालिकेच्या नव्या प्रस्तावित धोरणाला होकार भरला आहे.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची गणना यामुळे सोप्पी होईल. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आवरण्यासाठी मोठा हातभार लागेल.