हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोच्या दमदार शतकी सलामीमुळे हैदराबादनं कोलकात्याचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात कोलकात्यानं हैदराबादसमोर 160 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. हैदराबादनं हे आव्हान नऊ विकेट्स आणि तब्बल तीस चेंडू राखून सहज पार केलं.


वॉर्नर आणि बेअरस्टो या जोडीनं आपापली वैयक्तिक अर्धशतकं झळकावताना 131 धावांची सलामी दिली. यंदाच्या आयपीएलमधली या दोघांची ही चौथी शतकी भागीदारी ठरली. वॉर्नरनं 38 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांसह 67 धावा कुटल्या. तर बेअरस्टोनं सात चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 80 धावांची खेळी केली.


त्याआधी, सलामीवीर ख्रिस लीनच्या अर्धशतकी खेळीनंतरही कोलकाता नाईट रायडर्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आठ बाद 159 धावांचीच मजल मारता आली. ख्रिस लीननं 47 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 51 धावांची खेळी केली.


मात्र त्यानंतर कोलकात्याच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी उभारता आली नाही. हैदराबादकडून डावखुऱ्या खलील अहमदनं प्रभावी मारा करताना तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर भुवनेश्वर कुमारनं दोन आणि रशिद खान, संदिप शर्मानं प्रत्येकी एक विकेट घेतली.