कराची : पाकिस्तानचा ऑल राऊंडर खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या एका चाहत्याला भारतात अटक करण्यात आली आहे. आसाममधील एका मैदानावर आफ्रिदीच्या नावाची जर्सी घातल्याने या चाहत्याला अटक करण्यात आली. मात्र यानंतर आता आफ्रिदीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'जंग' या वृत्तपत्राने आफ्रिदीच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. क्रिकेटमध्येही राजकारण केलं जातंय. एखाद्या चाहत्याला अटक करणं ही निंदनीय घटना आहे, असं आफ्रिदीने म्हटलंय.

भाजप युवा मोर्चाच्या सदस्याकडून तक्रार करण्यात आल्यानंतर रिपन चौधरी नावाच्या युवकाला पोलिसांनी अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना याविषयी विनंती करणार असल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे. अशा असहिष्णुतेची निंदा करावी तेवढी कमी आहे. जर भारतामध्ये पाकिस्तानी खेळाडुंचे चाहते असू शकतात, तर पाकिस्तानातही भारतीय खेळाडुंचे चाहते आहेत, असं आफ्रिदीने म्हटलं आहे.

दरम्यान फेब्रुवारीमध्ये टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या एका पाकिस्तानी चाहत्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने घरावर भारताचा झेंडा फडकावला होता. दरम्यान पंजाबमधील एका न्यायालयाने त्याला जामिन दिला होता.