नवी दिल्ली : मराठीतील प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांना साहित्य विश्वातील मानाचा समजाला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आलोक’ या कथासंग्रहाला मराठी भाषेसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा झाली.


22 फेब्रुवारी 2017 रोजी साहित्य अकादमी पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 1 लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असं ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराचं स्वरुप आहे.

खेड्या-पाड्यातील कथा आणि व्यथा काळजाला भिडणाऱ्या शब्दांमधून मांडत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आसाराम लोमटेंना पुरस्कार घोषित झाल्याने मराठी साहित्य विश्वात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.



‘इडा पीडा टळो’ आणि ‘आलोक’ या दोन कथासंग्रहांमुळे मराठीतील संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा लेखकांमध्ये आसाराम लोमटेंचं नाव घेतलं जातं.

लेखनातील ग्रामीण बोली, गावाकडच्या माणसांच्या जगण्यातील खाच-खळगे, शेतकऱ्यांची स्थिती, दिनदुबळ्यांची व्यथा आणि त्या व्यथांशी लढणारी माणसं इत्यादी सारं आपल्या लेखनात मांडून कथेला थेट काळजाशी भिडवणारे आसाराम लोमटे हे नव्या पिढीच्या वाचकांमध्येह मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.

स्तंभलेखक म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. ग्रामीण भागातील समस्यांना आपल्या संवेदनशील लेखनीतून नेमक्या शब्दांत मांडणं, हे त्यांच्या स्तंभांचं वैशिष्ट्य समजलं जातं.

साहित्य अकादमी जाहीर झाल्यानंतर आसाराम लोमटेंची प्रतिक्रिया

"आलोक कथासंग्रहातून समकालीन ग्रामीण जगणं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आजूबाजेच जे भीषण वास्तव आहे, ते साहित्यात मांडणं गरजेचं आहे. किंबहुना संवेदनशील लेखकाचे ते कर्तव्यच आहे.", असे एबीपी माझाशी बोलताना आसाराम लोमटे म्हणाले.