CWG, Sanket Sargar Wins Medal : कॉमनवेल्थ स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरने दमदार कामगिरी करताना रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. केवळ 1 किलो वजनाच्या फरकाने संकेतचे गोल्ड मेडल हुकले. दुसऱ्या फेरीत जखमी झाल्याने संकेतला गोल्ड मेडल पदाला मुकावे लागले. 


बर्मिंगहॅम (इंग्लड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघामध्ये संकेतची 55 किलो वजनी गटामध्ये निवड झाली होती. वेटलिफ्टिंगमध्ये निवड झालेला संकेत राज्यातील पहिला खेळाडू होता. संकेत सरगर हा सांगली जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचा खेळाडू असून त्याने 2013-14 पासून गुरुवर्य दिवंगत के. नाना सिंहासने यांच्या सांगलीतील सुप्रसिद्ध दिग्विजय वेटलिफ्टींग इन्स्टिट्युटमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 13 व्या वर्षांपासून वेटलिफ्टींगचे धडे घेण्यास सुरुवात केली. 


संकेतचे वडील साधी पानाची टपरी चालवतात. त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीतून प्रयत्नांच्या जोरावर संकेतने एक मोठं यश मिळवलं आहे. त्याने केवळ आणि केवळ मेहनत आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ही कामगिरी केली असल्याने आज त्याचं सर्व भारतातून कौतुक होत आहे.


तब्बल 52 वर्षांनी सांगलीचा कॉमनवेल्थ स्पर्धेत डंका 


संकेत हा कै. मारुती माने यांच्या नंतर राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) स्पर्धेत सहभाग घेणारा सांगलीचा केवळ दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी 1970 मध्ये मारुती माने यांनी राष्ट्रकुल किडा स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. आज तब्बल 52 वर्षांनी सांगलीच्या एका खेळाडूने राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेपर्यंत झेप घेतली आहे.


मलेशियाच्या खेळाडूने जिंकलं सुवर्णपदक  


मलेशियाच्या बिन कसदन मोहम्मद आणिक (Bin Kasdan Mohamad Aniq) याने 142 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. संकेतला मागे टाकण्यासाठी मलेशियाच्या खेळाडूला तिसऱ्या प्रयत्नात 142 किलोग्राम वजन उचलणे अनिवार्य होतं. ज्यात तो यशस्वी देखील ठरला. त्यामुळे एकूण 249 किलोग्राम वजन उचलत त्याने थेट सुवर्णपदक मिळवलं असून संकेतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. केवळ एका किलोच्या फरकाने संकेचं सुवर्णपदक हुकलं.


इतर महत्त्वाच्या बातम्या