Ratnagiri News Updates : देशभक्ती, देशाभिमान आपल्या प्रत्येकाच्या रक्तात आणि उरात फुलून भरलेला आहे. देशसेवेसाठी अनेकजण आपापल्या परीने पावलं उचलत असतात. असाच एक प्रसंग रत्नागिरीत (Ratnagiri) समोर आला आहे. रत्नागिरी शहरात जयस्तंभ या भागात 100 फुटी ध्वजस्तंभ (Tiranga Flag) उभारण्यात आला आहे. हळूहळू हे ठिकाण प्रसिद्धीस येऊ लागले. पण, मागील दोन वर्षापासून या ध्वजस्तंभावरील ध्वज काही तांत्रिक कारणास्तव उतरवून ठेवण्यात आला होता. वाऱ्याच्या वेगापुढे स्तंभावरील ध्वज फार काळ टिकत देखील नाही. शिवाय केबल रोपवे देखील तुटला होता. त्यामुळे नवीन ध्वज लावण्यास अडचणी देखील येत होत्या.
दरम्यान, ध्वज पुन्हा डौलानं फडकावा यासाठी प्रशासन देखील प्रयत्न करत होते. पण, आवश्यक असणारी क्रेन देखील उपलब्ध होत नव्हती. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहिम देखील हाती घेण्यात आली आहे. सध्या हर घर तिरंगा मोहिम देखील जोरदारपणे राबवली जात आहे. परिणामी 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी (Ratnagiri Collector Office) कार्यालय येथील ध्वज डौलानं फडकावा यासाठी प्रयत्न देखील केले जात होते. त्यासाठी क्रेनचा शोध देखील जारी होती.
...अखेर क्रेन मिळाली
यानंतर सुदैवानं मुंबई - गोवा महामार्गावरून अशा प्रकारची क्रेन जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यानंतर संबंधित क्रेनवाल्याशी संपर्क साधला गेला. क्रेनवाल्यानं देखील तात्काळ होकार दिला. जवळपास तीन तास काम करत अखेर या ध्वजस्तंभाची दुरूस्ती केली गेली. त्यामुळे आता या जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वज डौलानं फडकणार आहे. अर्थात ज्या क्रेनच्या मदतीनं ध्वजस्तंभाची दुरूस्ती केली गेली. त्या क्रेनचे 8 तासांचे भाडे 5 लाख रूपये इतके आहे.
जिल्हा प्रशासनानं काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्रेनवाल्याला 5 लाख रूपये देण्याची तयारी दर्शवली. पण, क्रेन मालकानं ध्वजाची दुरूस्ती केली आहे. त्यामुळे पैसे नकोत असं सांगत प्रांजळपणे 5 लाखांचे भाडे नाकारले. त्यामुळे क्रेन मालकाच्या या निर्णयावर सध्या रत्नागिरी शहरासह आसपासच्या परिसरामध्ये कौतुक होत आहे. सुनिल स्टील कॅरिअर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हे लिमिटेड असं या क्रेन चालक कंपनीचं नाव आहे. ध्वजस्तंभाच्या दुरूस्तीचा प्रश्न मिटल्यानं आता दोन वर्षापासून असलेली प्रतिक्षा आता संपणार आहे. शिवाय, शान के साथ ध्वज पुन्हा एकदा डौलानं फडकणार आहे.