मुंबई : आजचा दिवस म्हणजे देवाचा जन्मदिन. हो... सचिन तेंडुलकर नावाच्या देवाचा. भारतासह अवघ्या जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर ज्याने तब्बल 24 वर्षे अधिराज्य गाजवलं त्या देवाचा आज वाढदिवस. क्रिकेट चाहत्यांना अगदी वेडा करुन टाकणारा हा महान फलंदाज भारतात जन्माला आला यासारखं भाग्य नसावं.


ज्या देशात क्रिकेटचा ‘क’सुद्धा माहित नाही, अशा देशातही सचिनचे लाखो चाहते आहेत. क्रिकेट या शब्दाला समानअर्थी शब्द म्हणजे सचिन. भारतातील अनेक खेड्यात आजही गल्ली-बोळात क्रिकेट खेळणारा शेंबड्या पोरगाही ‘मला सचिन व्हायचं आहे’ अशी इच्छा बोलून दाखवू लागतो तो फक्त आणि फक्त सचिनमुळेच.

सचिनने खरंच क्रिकेट रसिकांसह सगळ्यांनाच त्याच्या अफलातून फलंदाजीने वेडे केले. जेव्हा सचिनने प्राणप्रिय क्रिकेटमधून संन्यास घेतला तेव्हा मात्र सर्वांनाच दु:ख झालं. ‘देव कधी रिटायर होत नसतो’ असे म्हणत चाहते सचिनच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ लागले. आज विक्रमादित्य सचिनच्या वयाची 43 वर्षे पूर्ण झाली आणि 44 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

सचिन आतापर्यंत भारतासाठी 400 हून अधिक एकदिवसीय सामने, 200 कसोटी सामने खेळला. एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा, तर कसोटी सामन्यामध्ये 15 हजार 921 धावा करुन सचिनने क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवलं.

सचिन तेंडुलकरच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या 43 रेकॉर्ड्सवर प्रकाशझोत :

 

01. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 सामने खेळणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीत सचिन तब्बल 452 एकदिवसीय सामने खेळला.

02. सचिन जगातील चौथा असा खेळाडू आहे, ज्याने सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. सचिन अवघ्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरोधात पहिला कसोटी सामना खेळला.

03.  एकदिवसीय सामन्यात पहिलं द्विशतक झळकावण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरोधात ग्वाल्हेरमध्ये 2010 साली सचिनने द्विशतकी खेळी केली होती.

04.  एका वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्डही सचिनच्या नावावरच आहे. 1998 साली सचिनने 9 शतकांसह 1894 धावा केल्या होत्या. एका वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा सचिनचा रेकॉर्ड अद्याप कोणत्याही खेळाडून तोडला नाही.

 

05. 1996 ते 2007 पर्यंत सचिन सौरव गांगुलीसोबत एकूण 136 सामने खेळला, ज्यामध्ये त्याने 49.32 या सरासरीने 6 हजार 669 धावा केल्या. या सामन्यांमध्ये 21 शतकं आणि 23 अर्धशतकं केली. विशेष म्हणजे इथेही सचिनचा कुणीच रेकॉर्ड अद्याप तोडला नाही.

06. सचिन तेंडुलकर, राहुल द्रवीड आणि सौरव गांगुली या तिघांनी मिळून 6 हजार 200 धावांची भागिदारी केली आहे.

 

07. क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टुर्नामेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वचषकातही सचिनचे अनेक रेकॉर्ड्स आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात सचिनसारखा महान फलंदाज कुणी झाला नाही. विश्वचषकात खेळलेल्या 44 सामन्यांमध्ये सचिनने 57 च्या सरासरीने 2278 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 6 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

08. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा करुन ‘मॅन ऑप द मॅच’चा किताबही मिळवला होता. विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात असा खेळाडू झाला नाही.

 

09. 1996 सालचा विश्वचषक हा सचिनच्या कारकीर्दीचा दुसरा विश्वचषक होता. यामध्ये सचिनने 593 धावा केल्या होत्या. या विश्वचषकात सचिनच सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता.

10. सचिन 452 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 452 पैकी 340 सामन्यांमध्ये गोलंदाजीही केली आहे. आणि हाही एक रेकॉर्डच आहे.

 

11. सचिन एकदिवसीय क्रिकेटमध्ये 463 सामने खेळला, ज्यामधील 108 मालिकांमध्ये सहभाग घेतला. सचिनने 15 वेळा मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावला आहे. सचिनचा हा रेकॉर्डही अद्याप कोणी तोडला नाही.

12. सचिन तेंडुलकर भारतातील पहिला आणि एकमेवर खेळाडू आहे, ज्याने रणजी, दिलीप आणि इराणी ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात शतक ठोकला.

 

13. सचिन सुरुवातीला टेनिस प्लेयर जॉन मॅकनरोचा मोठा चाहता होता. शिवाय सचिनला क्रिकेटहून अधिक टेनिस खेळायला आवडायचं.

14. सचिनचं नाव त्याच्या वडिलांनी म्हणजे रमेश तेंडुलकर यांनी प्रसिद्ध संगीतकार सचिन देव यांच्या नावावरुन ठेवलं.

 

15. सचिन रणजीत प्रवेश करण्याच्या आधी मुंबईतील खेळाडूंची एक मॅच झाली. या मॅचमध्ये सचिनने हॅल्मेट घातला नव्हता, शिवाय समोर वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी गोलंदाजी करत होते. राजू कुलकर्णींना वाटले हा लहान मुलगा माझी मस्करी करतोय. म्हणून त्यांनी सचिनला बाऊंसर टाकायला सुरुवात केली.

16. सचिनला वेगवान गाड्यांची प्रचंड क्रेझ आहे. सचिनसाठी तो दिवस अजरामर असाच आहे, ज्या दिवशी सचिन डॉन ब्रॅडमन यांच्या 29 शतकांची बरोबरी केल्यानंतर मायकल शुमाकरने सचिनला फेरारी-360 मोडिना गिफ्ट म्हणून दिली.

 

17. 1995 मध्ये ‘रोझा’ सिनेमा पाहण्यासाठी सचिन लोकांनी ओळखून नये यासाठी वेशांतर करुन टॉकिजमध्ये गेला होता. मात्र अचानक डोळ्यांवर लावलेला गॉगली खाली पडला आणि उपस्थितांनी सचिनला ओळखले.

18. 1992 पर्यंतच सचिन क्रिकेट विश्वात लोकप्रिय झाला होता. त्यावेळी 4 महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन आल्यावरही सचिन मुंबईतल्या किर्ती कॉलेजच्या वतीने महाविद्यालयीन स्तरावरील क्रिकेट सामने खेळला होता. सचिनच्या डाऊन टू अर्थ स्वभावाचं हे एक उदाहरण.

 

19. सचिन जेव्हा ऐन फॉर्ममध्ये होता, त्यावेळी तो वजनदार बॅट वापरायाचा. सचिनच्या बॅटचे वजन असायचं 3.2 पौंड.

20. क्रिकेटमधील सुरुवातीला सचिनला वेगवान गोलंदाज बनायचं होतं. यासाठी सचिन एमआरएफ पेश फाऊंडेशनमध्येही गेला होता. मात्र उंची कमी असल्याचे कारण देत तेथील मेंटक डेनिस लिली यांनी सचिनला माघारी पाठवले. सचिन आणि गांगुली असे दोन खेळाडू आहे ज्यांना एमआरएफ पेश फाऊंडेशनमधून परत पाठवले गेले.

 

21. सचिन 19 व्या वर्षी काउंटी क्रिकेट खेळणारा सर्वात लहान खेळाडू आहे.

22. शतकांचा बादशाह सचिनला एकदिवसीय सामन्यातील त्याच्या पहिल्या शतकासाठी 79 सामने वाट पाहावी लागली होती.

 

23. टीव्ही अंपायरद्वारे बाद होणारा सचिन हा पहिला खेळाडू होता. 1992 मध्ये डर्बन कसोटीमध्ये सचिनला टीव्ही अंपायरने रन आऊट म्हणून निर्णय दिला होता.

24. रमाकांत आचरेकरांकडून क्रिकेट शिकण्यासाठी सचिनने शारदाश्रम विद्यामंदिरात  अॅडमिशन घेतले होते.

 

25. जाहिरातींमध्येही अव्वल स्थानी असणारा सचिन तेंडुलकर पहिल्यांदा कपिल देवसोबत एका जाहिरातीमध्ये दिसला होता.

26. सचिन जेव्हा फॉर्ममध्ये असायचा तेव्हा कोणत्याही गोलंदाजाचा त्याच्यासमोर निभाव लागायचा नाही.

 

27.  1996 पर्यंत सचिनच्या बॅटसाठी कोणताही स्पॉन्सर नव्हता. मात्र त्यानंतर सचिनपुढे स्पॉन्सर्सची रांग लागली.

28. सचिन त्याच्या शाळेमध्ये अतिशय मस्तीखोर मुलगा म्हणून ओळखला जायचा.

 

29. सचिन जेव्हा गोलंदाजी शिकत होता, त्यावेळी आपल्या मित्रांना टेनिस बॉलने गोलंदाजी करायला सांगायचा.

30. सचिन तेंडुलकर असा एकमेव खेळाडू आहे ज्याला खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, पद्म विभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

31. सचिन यॉर्कशायरकडूनही काऊंटी क्रिकेट खेळला नाही.

32. क्रिकेटच्या मैदानवरील सचिनच्या अंधविश्वासाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असाल. मात्र हे तुम्हाला माहित आहे का, सचिन ज्यावेळी फलंदाजीसाठी उतरायचा तेव्हा पत्नी अंजली उपवास करायचा.

 

33. सचिनला एकेकाळी अनेक जखमा व्हायच्या. त्यावेळी सचिन प्रत्येक जखमेवर बँड-एड किंवा प्लास्टर करुन घ्यायचा.

34. सचिनला घड्याळं आणि पर्फ्युम गोळा करण्याचा छंद आहे.

 

35. पाकिस्तानविरोधात सचिन जेव्हा खेळला, त्यावेळी त्याने सुनील गावस्करने गिफ्ट केलेला पॅड वापरलेला होता.

36. 1992 मध्ये सचिनने जेव्हा क्रिकेटमध्ये एक हजार धावा केल्या, तेव्हा एवढ्या धावा करणारा सचिन हा सर्वात लहान खेळाडू होता.

 

37. 1989 पासून कसोटी क्रिकेट खेळणारा सचिन पहिल्यांदा स्टम्पिंग आऊट झाला तो 2002 मध्ये आणि विशेष म्हणजे तेव्हा सचिन शतकापासून अगदी जवळ होता.

38. 20 वर्षांचा होण्याआधी सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतकं ठोकली होती. हा रेकॉर्डही अद्याप कुणी मोडला नाही.

 

39.  सचिन तेंडुलकर आतापर्यंत जगभरातील 90 स्टेडियमवर खेळला आहे आणि हाही एक रेकॉर्डच आहे.

40. 2008 साली ऑस्ट्रेलियातील एका रिअॅलिटी शोमध्येही सचिन दिसला होता.

 

41. शतकांचा शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डस् मैदानावर एकही शतकी खेळी केली नाही. मात्र प्रिंसेस डायनाच्या स्मृतीसाठी खेळवल्या गेलेल्या एका सामन्यात सचिनने शतक लगावला होता.

42. सचिनने एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. मात्र टी-20 मध्ये सचिन आणखी 4 सामने खेळला असता, तर 100 सामन्यांचा आकडा गाठला असता.

 

43. क्रिकेटच्या देवावर आधारित 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे.