Rohit Sharma vs Hardik Pandya : IPL 2024 च्या मोसमात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माने 11 हंगाम मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. IPL 2013 च्या मोसमात रोहित शर्माला पहिल्यांदा कर्णधार बनवण्यात आले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 आयपीएल जेतेपद पटकावले. पण रोहित शर्माच्या इच्छेविरुद्ध हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आलं होतं का? आता रोहित शर्माचं पुढचं पाऊल काय असेल? अशी चर्चा रंगली आहे. 


सोशल मीडियात मुंबई इंडियन्सविरुद्ध संताप सुरुच 


दरम्यान, आयपीएलचा मिनी लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होत आहे. मात्र, या लिलावापूर्वी सोशल मीडियात मुंबई इंडियन्सविरुद्ध संताप सुरुच आहे. ट्विटरवर #RIPMumbaiIndians ट्रेंड होत आहे. यामध्ये चाहते जर्सीला टांगून गळफास देत आहेत. काहींनी संघाची जर्सी जाळून टाकली आहे. काहींनी मुंबई इंडियन्सचे कार्ड कात्रीने कापून संताप व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर सोशल मीडियातून मुंबई संघाचे फाॅलोअर्स कमालीचे कमी झाले आहेत. 






...म्हणून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार का?


रोहित शर्मा आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळणार की दुसरा काही मार्ग स्वीकारणार? रोहित शर्मा आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो, असे सोशल मीडियावरील अनेकांना वाटते. म्हणजेच तो मुंबई इंडियन्स सोडणार आहे. मात्र, या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे सध्या अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. मात्र सोशल मीडियावर तर्कवितर्क सुरूच आहेत. दुसरीकडे, इंडियन एक्स्प्रेसमधील एका वृत्तातून समोर आले आहे की, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला विश्वचषक 2023 पूर्वीच त्यांच्या निर्णयाची माहिती दिली होती. वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने असेही म्हटले आहे की, रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास होकार दिला होता. यानंतर फ्रँचायझीने हार्दिकला ट्रेड केले आणि रोहितलाही संघात ठेवले.






कर्णधार होण्यासाठी हार्दिकची अट


पांड्या आयपीएल 2023 पासून मुंबई इंडियन्सच्या संपर्कात होता. त्याची एकच अट होती की तो मुंबईत परतला तर त्याला संघाचा कर्णधार बनवायचा. मुंबई इंडियन्सला हार्दिकला कोणत्याही किंमतीत आपल्या संघाचा भाग बनवायचा होता, त्यानंतर हार्दिकचा कर्णधारपदाचा विक्रमही उत्कृष्ट आहे. अशा परिस्थितीत मुंबई फ्रँचायझीने ही अट मान्य करून रोहितला आपल्या निर्णयाची माहिती दिली.






हार्दिकचा सर्वोत्तम टप्पा


गेल्या दीड वर्षांपासून खेळाच्या प्रत्येक विभागात पांड्या उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीने तो सतत गरजेच्या वेळी विकेट घेतो. फलंदाजी करताना त्याची बॅट चांगली कामगिरी करत आहे. आणि तो नेहमीच क्षेत्ररक्षणात तत्पर असतो. त्याचे कर्णधारपदही उत्कृष्ट आहे. अशा परिस्थितीत हार्दिकची एंट्री मुंबई इंडियन्ससाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकते. मुंबई इंडियन्स संघ गेल्या तीन आयपीएल हंगामात अंतिम सामना खेळलेला नाही.


हार्दिक पांड्याची कारकीर्द अशी आहे


पांड्या आयपीएल 2015 मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळला होता, तो मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. यानंतर मुंबई इंडियन्सकडून 6 हंगाम खेळत राहिला. परंतु आयपीएल लिलाव 2022 पूर्वी, हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले नाही, त्यानंतर हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा भाग बनला. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 जिंकली. त्यानंतर आयपीएल 2023 ची अंतिम फेरी गाठली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे गुजरात टायटन्स उपविजेतेपदावर राहिला. मात्र, आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्या आपल्या जुन्या टीम मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या