Yashasvi Jaiswal Century India vs England : परिणामांची पर्वा न करता ज्या पद्धतीने बेधडक फलंदाजी करत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने विरोधी संघाना घाम फोडला त्याच मार्गाने यशस्वी जैस्वालची वाटचाल सुरु आहे. वयाच्या बाविशीत टीम इंडियाकडून सहावी कसोटी खेळताना दुसऱ्या शतकाची नोंद केली. त्याने इंग्लंडविरुद्ध दमदार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. गेल्या काही दिवसांपासून संधी मिळताच जेव्हा जेव्हा टीम इंडियाला गरज पडली आहे, तेव्हा यशस्वीने जबाबदारी घेतली आहे.विशेषत: कसोटीत जवळपास प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. विशेष म्हणजे यशस्वीचे भारतातील हे पहिलेच कसोटी शतक आहे. यासह त्याने या खेळीत आणखी काही विक्रमही केले आहेत.


कॅप्टन रोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरली!


दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटीत यशस्वीने दमदार शतकी खेळी केली. त्याच्या खेळीचे ड्रेसिंग रुममधूनही जोरदार स्वागत करण्यात आले. यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आघाडीवर होता. दरम्यान, रोहितने यशस्वीच्या देशांतर्गत केलेल्या दमदार खेळीनंतर 162 आठवड्यांपूर्वी नेस्ट सुपरस्टार म्हणून पोस्ट केली होती. आज (2 फेब्रुवारी) तोच सुपरस्टार यशस्वी कॅप्टन रोहित असतानाच टीम इंडियासाठी चमकला. त्यामुळे रोहितची जुनी पोस्ट व्हायरल झाली आहे. तब्बल 162 आठवड्यांनी यशस्वीने रोहितचा शब्द खरा करून दाखवला आहे.   






यशस्वी जैस्वालची एका बाजूने लढत 


यशस्वी जैस्वालसाठी आजचा सामना सोपा नव्हता. रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिललाही मोठी खेळी करता आली नाही. दोन गडी लवकर बाद झाल्याने जैस्वालवर दडपण येणे अपरिहार्य होते. दुसऱ्या टोकाला श्रेयस अय्यर होता, जो सध्या फॉर्मात आहे. अशा परिस्थितीत यशस्वीने जबाबदारी घेत खेळ केला.  त्याने 151 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याने षटकार मारून आपले शतकही पूर्ण केले, जे भारतीय सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागची आठवण करून देते.






यशस्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या


यासह जैस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. जैस्वालने यापूर्वी 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 502 धावा केल्या होत्या. या सामन्यापूर्वी त्याने 5 कसोटी सामन्यांमध्ये 411 धावा केल्या होत्या, ज्याची संख्या आता 511 पेक्षा जास्त झाली आहे. त्याचे हे दुसरे कसोटी शतक आहे. त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची कसोटी सरासरी 45 च्या आसपास आहे आणि या फॉरमॅटमध्ये तो 60 च्या स्ट्राईक रेटने धावा करतो. मात्र, अद्याप वनडेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. 


या मालिकेतील भारतीयाचे पहिले शतक


यशस्वी जैस्वालच्या या शतकाची खास गोष्ट म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेतील हे टीम इंडियाचे पहिले शतक आहे. पहिल्या सामन्यात केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि यशस्वी जैस्वाल यांनी 70 हून अधिक धावांची खेळी खेळली, पण कोणालाही शतकापर्यंत मजल मारता आली नाही. हैदराबाद कसोटीत ऑली पोपने इंग्लंडकडून शतक झळकावले. या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने 196 धावा केल्या होत्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला त्याचे शतक पूर्ण करता आले नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या