Champai Soren New CM Of Jharkhand :  झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) उपाध्यक्ष चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी अटक केली. त्यापूर्वी त्यांनी (Champai Soren) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी चंपई सोरेन (Champai Soren Jharkhand CM) यांना पद आणि गोपनियेतेची शपथ दिली. याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. 


राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध कऱण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाची युती आहे. झारखंड मोर्चाकडे सदध्या  29 तर काँग्रेसकडे 17 आमदार आहेत. त्याशिवाय आरजेडीच्या एका आमदाराचाही सपोर्ट आहे. झारखंडमधील बहुमताचा आकडा 41 इतका आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमदारांना हैदराबादमधील हॉटेलला पाठवण्यात येणार आहे. 






मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी चंपाई सोरेन यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतली होती. यानंतर चंपाई म्हणाले की गुरुजी आमचे आदर्श आहेत, शपथ घेण्यापूर्वी आम्ही गुरुजी आणि माताजी (रुपी सोरेन) यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मी झारखंड चळवळीशी निगडीत होतो आणि मी त्यांचा शिष्य आहे.


झारखंडमधील पक्षीय बलाबल कसं आहे? 


81 सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 48 आमदार आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे 29, काँग्रेसकडे 17, RJD कडे एक आणि CPI (ML) कडे एक आमदार आहे.


विरोधी पक्ष एनडीएकडे 32 आमदार आहेत. यामध्ये भाजप 26, AJSU 3, NCP (AP) 1 आणि 2 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तसेच एक जागा रिक्त आहे.


कौटुंबिक विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत


हेमंत सोरेन यांना अटक होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडेम मुख्यमंत्रीपदाची सूत्रं देण्यासाठी हालचाल सुरू केली. पण हेमंत सोरेन यांचे लहान बंधू आणि हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन यांच्या विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत असं सांगण्यात येतंय. 


झारखंड जमीन घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय? 
ईडीनं रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या 4.55 एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीनं रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रं आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला.