Success Story : अलिकडच्या काळात अनेत शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. एका अशाच तरुणाने नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली आहे. हरियाणातील पंचकुला येथे पाच एकर जमीन भाड्याने घेऊन पेरुच्या शेतीचा (Guava farming) यशस्वी प्रयोग केला आहे. राजीव भास्कर असं या शेतकऱ्याचं नाव असून, पेरु शेतीतून त्यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


राजीव भास्कर हे एक समृद्ध कृषी उद्योजक आहेत. आज ते लाखो लोकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. ते रायपूर येथील एका बियाणे कंपनीत कामाला देखील होते. कंपनीत काम करताना मिळालेला अनुभव त्यांना श्रीमंत शेतकरी बनण्यास कामी आला.  त्यांनी व्हीएनआर सीड्समध्ये विक्री आणि विपणन संघाचे सदस्य म्हणून काम केले आहे. या ठिकाणी काम करत असताना त्यांना भारतातील विविध भागातील शेतकऱ्यांशी जोडण्याची संधी मिळाली. त्यामुळं त्यांची शेतीकडे ओढ वाढली. यावेळी राजीव भास्कर यांनी थाई पेरुची लागवड आणि त्यातील अनोख्या जातीची माहिती घेतली. त्यामुळं त्याच्या यशाचा मार्ग मोकळा झाला. कंपनीत काम करत असतानाच त्यांनी एमबीएही केले. 


नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय 


राजीव भास्कर हे उत्तराखंडमधील नैनितालचे (Nainital) आहेत. 2017 मध्ये राजीव यांनी एक धाडसी पाऊल उचलले. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थाई पेरूची लागवड केली. त्यासाठी त्यांनी हरियाणातील पंचकुला येथे पाच एकर जमीन भाड्याने घेतली. राजीव यांनी सेंद्रिय पदार्थांपासून तयार केलेली बायोसाइड्स आणि जैव खते पिकासाठी वापरली. शेतीच्या थ्री-लेअर बॅगिंग पध्दतीचा वापर करून त्यांनी पिकाचे कोणत्याही नुकसानीपासून संरक्षण केले.राजीवने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2017 मध्ये पेरुची लागवड केली. तसेच अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादनावरही भर दिला. त्यानंतर त्यांनी अन्य तीन गुंतवणूकदारांसोबत 2019 मध्ये पंजाबमधील रूपनगर येथे 55 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली.


प्रति एकर  सरासरी 6 लाख रुपये नफा 


राजीव आणि त्यांच्या टीमने 25 एकरांवर पेरुची लागवड केली. ही लागवड थाई पेरुची केली. वर्षातून दोन वेळा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पेरुची काढणी केली जाते.  स्पर्धा टाळण्यासाठी राजीभ भास्कर यांच्या टीमने आपल्या उत्पादनाची केवळ पावसाळ्यात विक्री केली. राजीवने आपले पेरु 10 किलोच्या बॉक्समध्ये पॅक करुन  दिल्ली एपीएमसी मार्केटमध्ये त्याची विक्री केली. त्यांना सरासरी 6 लाख रुपये प्रति एकर नफा मिळवला.


पेरुच्या झाडांचे सरासरी कमाल उत्पादन वाढवण्याची योजना


दरम्यान, सध्या राजीव यांनी पेरुच्या झाडांचे सरासरी कमाल उत्पादन 25 किलो प्रति झाडावरून 40 किलोपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. राजीव ज्या भागात शेती करतात, त्या भागात रासायनिक शेतीचे प्रमाण कमी आहे. .