फेडररच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा सन्मान; स्वित्झर्लंडकडूनं चांदीचं नाणं बाजारात
एबीपी माझा वेब टीम | 03 Dec 2019 11:50 PM (IST)
महान टेनिसपटू रॉजर फेडररच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंडनं वीस फ्रॅन्क किमतीचं चांदीचं नाणं बाजारात आणलं आहे. फेडररची बॅकहॅण्ड खेळतानाची प्रतिमा या नाण्याच्या एका बाजूला आहे.
MEXICO CITY, MEXICO - NOVEMBER 23: Roger Federer of Switzerland plays a shot during 'The Greatest Match' between Roger Federer and Alexander Zverev at Plaza Mexico on November 23, 2019 in Mexico City, Mexico. (Photo by Angel Castillo/Jam Media/Getty Images)
मुंबई : स्वित्झर्लंडचा महान टेनिसवीर रॉजर फेडररच्या टेनिसमधल्या दैदिप्यमान कामगिरीचा गौरव नुकताच स्वित्झर्लंड प्रशासनाकडून करण्यात आला आहे. फेडररच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंडनं वीस फ्रॅन्क किमतीचं चांदीचं नाणं बाजारात आणलं आहे. या नाण्याच्या एका बाजूला फेडररची बॅकहॅण्ड खेळतानाची प्रतिमा आहे. ३८ वर्षांचा फेडरर हा आजच्या जमान्यातला सर्वात महान टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवरच्या कारकीर्दीत 103 विजेतीपदं पटकावली आहेत. त्यात 20 ग्रँड स्लॅम विजेतीपदांचाही समावेश आहे. फेडररच्या याच कामगिरीच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंडनं वीस फ्रॅन्क किमतीची ५५ हजार चांदीची नाणी बाजारात आणली आहेत. फेडररच्या चाहत्यांना स्मृतिचिन्ह म्हणून ही नाणी विकत घेता येतील. येत्या मे महिन्यात फेडररच्या सन्मानार्थ 50 फ्रॅन्क किमतीचं सोन्याचं नाणं बाजारात आणण्याचा स्वित्झर्लंड प्रशासनाचा मानस आहे. फेडररनं या सन्मानाबद्दल आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करुन याबद्दल आभार मानले आहेत. जागतिक क्रमवारीत फेडरर सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. वर्षाची अखेरीस तिसऱ्या नंबरवर राहण्याची फेडररच्या कारकीर्दीतली ही पंधरावी वेळ आहे. वयाच्या 38व्या वर्षी अशी कामगिरी करणारा फेडरर एकमेव टेनिसपटू आहे. संबंधित बातम्या : अर्जेन्टीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेसीने सहाव्यांदा पटकावला 'बॅलन डी'ओर पुरस्कार अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, उत्तरप्रदेशचा प्रियम गर्ग सांभाळणार कर्णधारपदाची धुरा 'हा' भारतीय फलंदाज ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडू शकतो : डेव्हिड वॉर्नर