अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, उत्तरप्रदेशचा प्रियम गर्ग सांभाळणार कर्णधारपदाची धुरा
एबीपी माझा वेब टीम | 02 Dec 2019 12:47 PM (IST)
अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून उत्तरप्रदेशचा प्रियम गर्ग संघाची धुरा सांभळणार आहे. तसेच मुंबईचा यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांशु सक्सेना या खेळाडूंचाही संघात समावेश असणार आहे.
मुंबई : 19 वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या स्पर्धेसाठी फलंदाज प्रियम गर्गची भारताच्या अंडर-19 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर ध्रुव चंद जुरेल संघाचा उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघ 19 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पाचव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. याआधी भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान भारतीय संघानं पटकावला आहे. भारत ग्रुप एमध्ये जपान, न्यूझीलँड आणि श्रीलंका संघासोबत ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण विश्वचषकात 16 संघ सहभागी होणार आहेत आणि त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. मुंबईचा यशस्वी जयस्वालसोबत दिव्यांश सक्सेना आणि अथर्व अंकोलेकरसह उत्तराखंडचा शशी रावत आणि हैदराबादचा तिलक वर्मा यांचा भारतीय संघाच्या मुख्य फलंदाजांमध्ये समावेश आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघासाठी यशस्वी जयस्वालने उत्तम कामगिरी बजावली होती. यशस्वीने ऑक्टोबरमध्ये मुंबईसाठी 12 षट्कार आणि 17 चौकारांच्या मदतीने 154 चेंडूत 203 धावांची कामाई केली होती. आपल्या या धावांच्या जोरावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू बनला होता. दरम्यान, 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने जेतेपद पटकावले होते. विश्वचषकासाठी भारतीय संघ : प्रियम गर्ग (कप्तान), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार और विकेटकीपर), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील. विश्वचषकासाठी गट : अ गट - भारत, जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका ब गट - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया आणि वेस्ट इंडिज क गट - बांगलादेश, पाकिस्तान, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे ड गट - अफगाणिस्तान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती संबंधित बातम्या :