अॅडलेड : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांमध्ये अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीत सलामीवीर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित केला. वॉर्नरने नाबाद 335 धावांची खेळी उभारली. त्याने 418 चेंडूंमधली ही खेळी 39 चौकार आणि एका षटकाराने सजवली.
ऑस्ट्रेल्याने डाव घोषित केल्यानंतर सर्वत्र अशी चर्चा सुरु आहे की, त्यांनी (ऑस्ट्रेलियाने) इतक्या लवकर डाव घोषित करायला नको होता. वॉर्नरला अजून काही वेळ खेळण्याची संधी मिळाली असती तर त्याने कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक 400 धावा करणाऱ्या ब्रायन लाराचा विक्रम मोडला असता. एका इंग्रजी क्रीडा वाहिनीने यासंदर्भात वॉर्नरकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, डाव घोषित करणे हा संघाचा निर्णय होता आणि तोच निर्णय योग्य होता.
वॉर्नर म्हणाला की, ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट मैदानांच्या सीमारेषा या दूर आहेत. या मैदानांवर दिवसभर खेळल्यानंतर खूप थकवा येतो. 200-300 धावांची खेळी केल्यानंतर मोठे फटके मारणं अवघड जातं. अशा परिस्थितीत फंलदाज बाद होण्याच्या शक्यता अधिक असतात. द्विशतक झाल्यानंतर मी मोठे फटके मारण्याऐवजी एक-दोन धावा काढण्यावरच अधिक भर देत होतो.
दरम्यान, वॉर्नरला विचारण्यात आले की, ब्रायन लाराचा एका डावात 400 धावा फटकावण्याचा विक्रम कोण मोडू शकतो? त्यावर उत्तर देताना वॉर्नर म्हणाला की, भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा हा विक्रम मोडू शकतो. रोहित शर्मामध्ये ती क्षमता आहे, असे वॉर्नरला वाटते.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेन याने लवकर डाव घोषित केल्यामुळे त्याच्यावर सध्या टीका सुरु आहे. वॉर्नरला लाराचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अवघ्या 66 धावांची आवश्यकता होती. ज्या स्ट्राईक रेटने आणि आक्रमकतेने वॉर्नर खेळत होता. ते पाहता अवघ्या 15-16 षटकांचा अधिक खेळ झाला असता तर वॉर्नरने लाराचा विक्रम मोडीत काढला असता, असा अंदाज अनेक क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.
'हा' भारतीय फलंदाज ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडू शकतो : डेव्हिड वॉर्नर
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
01 Dec 2019 06:12 PM (IST)
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित केला. वॉर्नरने नाबाद 335 धावांची खेळी उभारली.
Getty image
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -