अर्जेन्टीनाचा दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेसीने सहाव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2015 नंतर मेसीचा हा पहिला बॅलन डी'ओर पुरस्कार आहे. गेल्या बारा महिन्यांत मेसी त्याच्या कारकीर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यानं गेल्या मोसमात ३६ गोल झळकावून, बार्सिलोनाला स्पॅनिश ला लीगा जिंकून दिली. यंदा चॅम्पियन्स लीगमधला तो सर्वोत्तम स्कोररही ठरला.
यंदाच्या मोसमातही त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येत आहे. त्यानं 44 सामन्यांत 41 गोलची नोंद केली आहे. दरम्यान, 32 वर्षीय मेसीने 2009 ते 2012 मध्ये लागोपाठ चार वेळा या पुरस्कार पटकावला होता. यंदा या पुरस्कारासाठी मेसीसह लिव्हरपूल चा डिफेंडर वर्जिल वॅन डिच दुसऱ्या स्थानावर आणि जुवेंट्सचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो वोटिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. रोनाल्डोने आतापर्यंत सहा वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
मेसीने मागील वर्षाचा विजेता लूक मोडरिचकडून पुरस्कार स्विकारला. त्यावेळी तो म्हणाला, 'मी दहा वर्षांआधी पहिल्यांदा हा पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो आणि आपल्या तिन्ही भावांसोबत येथे आलो होतो. माझ्यासाठी हे एका सुंदर स्वप्नाप्रमाणे होतं. पुढे बोलताना मेसी म्हणाला की, सर्वकाही ठिक असेल तर मला असं वाटतं की, मी आणखी काही वर्ष खेळू शकतो. वेळ फार वेगाने पुढे जात आहे आणि सर्वकाही अचानक होत आहे.' इग्लंडचा माजी फुटबॉलर डेव्हिड बेकहॅम आणि गॅरी लिनेकर सहाव्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणाऱ्या मेसीला शुभेच्छा दिल्या.