RCB vs CSK IPL 2020 : यंदाच्या मोसमात आतापर्यंत सुमार कामगिरी बजावलेल्या चेन्नईनं बंगलोरविरुद्ध आपल्या लौकीकास साजेशी कामगिरी बजावली. या सामन्यात चेन्नईनं बंगलोरचा आठ विकेट्सनी पराभव करुन बाद फेरी गाठण्याच्या पुसटशा आशा जिवंत ठेवल्या आहेत. चेन्नईचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय ठरला. या सामन्यात बंगलोरनं चेन्नईसमोर विजयासाठी 146 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. चेन्नई हे आव्हान आठ चेंडू बाकी ठेऊन पूर्ण केलं.
चेन्नईच्या बंगलोरविरुद्धच्या या विजयात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडूनं महत्वाची भूमिका बजावली. गेल्या चार सामन्यात फारशी चुणूक न दाखवलेल्या ऋतुराजनं आज मात्र जबाबदार खेळी केली. त्यानं 51 चेंडूत नाबाद 65 धावांचं योगदान दिलं. त्याच्या या खेळीत चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. ऋतुराजनं अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली. रायुडूनंही 27 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा फटकावल्या. रायुडू बाद झाल्यानंतर धोनीनं ऋतुराजच्या साथीनं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
बंगलोरची संथ खेळी
त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही बंगलोरला 20 षटकात 6 बाद 145 धावांचीच मजल मारता आली. विराटनं 43 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकारासह 50 धावांची खेळी केली. तर एबी डिव्हिलियर्सनं 36 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा केल्या. याशिवाय बंगलोरच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईकडून सॅम करननं प्रभावी मारा करताना तीन षटकात 19 धावा देत 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर दीपक चहरनं दोन आणि मिचेल सँटनरनं एक विकेट घेतली.
IPL 2020 : वडील वारले तरीही 'हा' खेळाडू जिद्दीनं खेळला, सामनाही जिंकला
विराटचं षटकारांचं द्विशतक
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आपल्या आयपीएल कारकीर्दीतला 200वा षटकार ठोकला. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत विराटनं हा विक्रमी षटकार ठोकला. अशी कामगिरी करणारा विराट हा आजवरचा पाचवा खेळाडू ठरला. याआधी आयपीएलच्या मैदानात ख्रिस गोल (336), एबी डिव्हिलियर्स (231), महेंद्रसिंग धोनी (216) आणि रोहित शर्मानं (209) दोनशे पेक्षा जास्त षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे.
बंगलोर हिरव्या जर्सीत मैदानात
विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ आज हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरला. आयपीएलच्या मैदानात दरवर्षी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बंगलोरच्या संघातील खेळाडू एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही बंगलोरनं चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ही परंपरा कायम राखली.