जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते आज पहिल्यांदा जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. यावेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले आहे. मात्र, या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिसून न आल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला आहे.


याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे महानगर प्रमुख अभिषेख पाटील यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं आहे की खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ते आज पहिल्यांदा राष्ट्रवादी कार्यालयात आले आहेत. अगदी आयत्या वेळी आणि सकाळी लवकरच हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याने बाहेर गावी असलेले अनेकजण या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत. शिवाय काही दिवसांत नाथाभाऊ खडसे यांच्या स्वागताचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यावेळी सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत, कमी वेळात आणि अगदी सकाळच्या वेळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यात काही नेते त्यांच्या खाजगी कामानिमित्ताने जिल्ह्याच्या बाहेर असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाहीत.

मी सन्यास घ्यावा अशी चंद्रकांत पाटील यांची इच्छा होती : एकनाथ खडसे


या व्यतिरिक्त त्यांच्या अनुपस्थिती बाबत कोणतंही कारण नाही, असं सांगण्यात येत असलं तरी महानगर प्रमुखांनी पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून कार्यक्रमाचं नियोजन करायला हवं असं नाव न सांगण्याचा अटीवर काही नेत्यांनी म्हटलं आहे. खडसे यांच्या स्वागत समारंभाला महानगर प्रमुख अभिषेख पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित असले तरी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैया पाटील, माजी आमदार सतीश आण्णा पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, अरुण भाई गुजराती, गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वर जैन, हाजी गफ्फार मलिक इत्यादी नेते हे या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला आहे. एकंदरीतचं या सर्व बाबींचा विचार केला तर खडसे यांना राष्ट्रवादी पक्षातील गटबाजी पाहता, त्यावर नियंत्रण मिळवून पक्ष वाढीचं मोठं आव्हान असणार आहे.


EXCLUSIVE Eknath Khadse | भाजपने विधानसभेत तिकीट कापलं, घरी बसवलं : एकनाथ खडसे