नाशिक : राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपल्याविरुद्ध कसा कट करण्यात आला याचा पुनरुच्चार केला. शरद पवार यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं आहे. माझं राजकीय करिअर संमवण्याचे काम काही जणांकडून सुरु होतं, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.


जे अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतरांचे झाले, तेच माझे झाले असते. पण मी गप्प बसणारा नव्हतो. मी सन्यास घ्यावा अशी चंद्रकांत पाटील यांची इच्छा होती. मार्गदर्शन करावे असं ते म्हणत होते. मात्र मी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. मी पदासाठी नाही तर मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षात गेलो आहे, असं खडसे म्हणाले.


मी घरी बसलो असतो, मात्र शरद पवार यांनी पुन्हा मला राजकारणात आणले. येणारा काळ ठरवेल पुढे काय होईल. अलीकडे आपल्याला अनेकदा अपमान अवहेलना सहन करावी लागली. कार्यकर्ते चिडत होते, संताप व्यक्त करत होते. एका व्यक्तीमुळे अन्याय झाला, त्यामुळे विकास कामे रखडली मंत्रिपद गेलं. पद मिळेल की नाही याची पर्वा नाही. कदाचित पुन्हा मिळेल, पण जो अपमान झाला तो कसा भरून निघणार, असा सवाल खडसेंनी विचारला.


विधानसभा निवडणुकीत माझ्या ऐवजी रोहिणीला तिकीट देण्यात आलं. रोहिणीला पाडण्यासाठी काम करुन काहींनी गद्दारी केली, ज्यांना आपण मोठे केले होते त्यांनीच गद्दारी केली. त्यांच्यावर कारवाई झाली नाही म्हणून त्यांच्या पाठिशी कुणीतरी आहे ही धारणा आहे. भाजपने तिकीट नाकारलं तेव्हाही राष्ट्रवादीचा रस्ता मोकळा होता, मात्र तेव्हा मी पक्षांतर केलं नाही. रोहिणी आणि माझ्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला गेला, असं खडसेंनी सांगितलं. एबीपी माझाचा पोल सांगतो आपला निर्णय बरोबर आहे. 80 टक्के लोक माझा निर्णय बरोबर आहे हे सांगत होते, असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं.