नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा धक्का लागला आहे. आयपीएलपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कूल्टर नाईलला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली.


नाथन कूल्टर नाईलच्या जागेवर न्यूझीलंडचा ऑलराऊंडर खेळाडू कोरी अँडरसनचा समावेश करण्यात आला. कूल्टर नाईलवर आरसीबीने 2 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत खरेदी केलं होतं. आयपीएलच्या तांत्रिक समितीने या बदलाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

कूल्टर नाईलने गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करत आठ सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलच्या दहाव्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता.

रजिस्टर्ड अँड अव्हेलेबल प्लेयर्स पूल म्हणजेच आरएपीपी नियमांनुसार, आरसीबीला दोनपैकी एक पर्याय निवडायचा होता. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने अँडरसनला त्याची बेस प्राईस दोन कोटींमध्ये खरेदी केलं.

आयपीएलमध्ये आरसीबीचा पहिला सामना 8 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे.