मुंबई : माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर तोफ डागली आहे. रवी शास्त्री हे अतिशय बालिश असल्याचे वक्तव्य गंभीरने केली आहे. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने शास्त्री यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गंभीरने "रवी शास्त्री यांचे क्रिकेटमधील कर्तृत्व काय?" असा सवाल उपस्थित केला आहे. रवी शास्त्री जेव्हा क्रिकेट खेळत होते. त्या काळात भारताने परदेशात जे सामने जिंकले त्या सामन्यांच्या वेळी रवी शास्त्री भारतीय संघाचा भाग नव्हते. ऑस्ट्रेलियामधील एकाच स्पर्धेत ते चमकले होते, त्यामुळे त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले, असे म्हणता येणार नाही.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतला पहिला सामना भारताने जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिलाच कसोटी सामना जिंकणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला असल्याने सर्वच स्तरातून भारतीय संघ, कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान गंभीरने शास्त्री यांच्यावर तोफ डागली आहे.
भारत जर एखाद्या संघासोबत 4-1 अशी मालिका जिंकला तर शास्त्री त्यास सर्वोत्तम संघ संबोधतात. परंतु एखादी मालिका अशा पद्धतीने जिंकली म्हणून तो संघ सर्वोत्तम ठरत नाही. तसेच शास्त्री प्रशिक्षक झाल्यापासून भारताने परदेशात किती मालिका जिंकल्या? असा सवालही गंभीरने उपस्थित केला आहे.