मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बिग बजेट चित्रपट '2.0' ची दुसऱ्या आठवड्यानंतर 700 कोटी रुपयांची विक्रमी कमाई झाली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 500 कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या आठवड्यात 700 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. 'बाहूबली द बिगिनिंग' या चित्रपटाच्या लाईफटाईम कमाईचा टप्पा पार केला आहे.

जागतिक कलेक्शनमध्ये पहिल्या आठवड्यात 2.0 या सिनेमाने 526.86 कोटी रुपयांची घवघवीत कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 27.31 कोटी, दुसऱ्या दिवशी 32.57 कोटी, तिसऱ्या दिवशी 36.45 कोटी, चौथ्या दिवशी 39. 20 कोटी तर पाचव्या दिवशी 17.13 कोटी, सहाव्या आणि सातव्या दिवशी 31.46 कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी माहिती चित्रपट तज्ज्ञ विजयबाला यांनी ट्वीट करुन दिली.


हिंदी व्हर्जनमध्ये 177.75 कोटींची कमाई

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार 2.0 या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात 139.75 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या आठवड्यात 38 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. हिंदी व्हर्जनची एकूण कमाई 177.75 कोटी रुपयांची झाली आहे. 2.0 चित्रपट गुरुवारी 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता, त्यामुळे पहिला आठवडा 8 दिवसांचा होता.


रजनीकांतसह 2.0 मध्ये अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन, आदिल हुसेन, आणि सुधांशु पांडे यांची प्रमुख भूमिका आहे. अक्षय कुमारचा हा पहिला दक्षिणात्य चित्रपट आहे. चित्रपटात अक्षयने खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर रजनीकांत वैज्ञानिक आणि रोबोच्या भूमिकेत आहे.