Rafael Nadal French Open 2022 : क्ले कोर्टचा बादशाह अशी ओळख असलेल्या राफेल नदालनं (Rafael Nadal) नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) पराभव करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तब्बल चार तास सुरू असलेल्या या रोमांचकारी सामन्यात नदालनं गतविजेत्या जोकोविचचा  6-2, 4-6, 6-2, 7-6 अशा चार सेट्समध्ये पराभव केला. 21 ग्रँड स्लॅम विजेतेपदं मिळवलेल्या राफेल नदालचा सामना आता तृतिय मानांकित अलेक्झांडर ज्वेरेव सोबत होणार आहे. 


नदालने जोकोविचविरुद्ध 29वा विजय संपादन केला आहे. याआधी दोघांमधील 58 सामन्यांत जोकोविचनं 30 आणि नदालनं 28 सामने जिंकले आहेत. या विजयासह राफेल नदालनं गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. विशेष म्हणजे, फ्रेंच ओपनमधील नदालचा हा 110 वा विजय ठरला. त्याला या स्पर्धेत केवळ तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.


नदालने 13 फ्रेंच ओपन तसेच 2 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 विम्बल्डन ओपन आणि 4 यूएस ओपन जेतेपदं जिंकली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यानं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. तर 2020 मध्ये फ्रेंच ओपनचं अखेरचं विजेतेपद जिंकलं होतं. 1968 मध्ये सुरू झालेल्या टेनिसच्या ओपन एरामध्ये ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद 13 वेळा पटकावणारा नदाल जगातील पहिला खेळाडू आहे. फ्रेंच ओपन लाल मातीवर खेळली जाते. याच कारणामुळे नदालला 'लाल माती'चा राजा असंही म्हटलं जातं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :