Rachin Ravindra : क्रिकेट कारकिर्दीत पहिला वर्ल्डकप खेळत असलेल्या न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. रचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वेगवान माऱ्याविरुद्ध दमदार फलंदाजी करताना वर्ल्डकपमधील दुसरे शतक झळकावले.त्याने सलामीच्या लढतीमध्येही इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी करत आपली प्रतिभा क्रिकेट जगताला दाखवून दिली होती. त्याच प्रतिभेचा नमुना पुन्हा एकदा पेश करताना रचिनने 116 धावांची दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसे काढली. त्याने आपल्या या खेळीत नऊ चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी करून न्युझीलंडला डावालाच भक्कम आधार दिला.
रचिनच्या या खेळीमुळे रचिन रवींद्रच्या नावावर एक मोठा पराक्रम जमा झाला आहे. वयाच्या 23व्या वर्षी वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये दोन शतके झळकवण्याचा पराक्रम यापूर्वी क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. या पराक्रमाची रचिनने बरोबरी केली आहे. रचिन सध्या हा अवघ्या 23 वर्षाचा खेळाडू असून त्याने या वर्ल्डकपमध्ये अक्षरशः धावांचा रतीब घातला आहे. त्याची आजची खेळी सुद्धा तीच साक्ष देणारी होती.
रचिनच्या नावाचा रंजक इतिहास!
रचिनचे वडिल अनिवासी भारती आहेत. त्याच्या वडिलांनी राहुल द्रविड यांच्या नावातून र आणि सचिन तेंडुलकरच्या नावातून चिन घेत आपल्या मुलाचं नाव रचिन रविंद्र ठेवले होते. तोच आज रचिन रविंद्र हा सचिनच्या विक्रमाची बरोबरी करत असेल, तर हा क्षण त्याच्या वडिलांसाठी सुद्धा एक सुवर्णक्षण असेल यामध्ये शंका नाही.
या स्पर्धेमध्ये न्युझीलंडचा झंझावात पाहता चचिनला आणखी मोठ्या पराक्रमाची संधी आहे. त्यामुळे त्याची खेळी निश्चितच संघासाठी एक सुखद क्षण असेल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असलेल्या रचिनने वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामन्यांमध्ये आपली अष्टपैलू प्रतिभा दाखवून देत न्युझीलंडला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. भारताविरुद्धही त्याने 87 धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याला भविष्यामध्ये न्यूझीलंडचा आधारस्तंभ म्हणून पाहिलं जाईल यात वाद नाही.
इतर महत्वाच्या बातम्या