पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना गावबंदीचा फटका बसला आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा रोष पाहून त्यांनी बारामतीचा दौरा अखेर रद्द केला आहे. दरम्यान, यावर आता शरद पवार  (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया आली आहे. "अजित पवार यांनी माळेगावला जाणं टाळलं हे योग्य आहे. वातावरण गरम असताना तिथं न जाणं हे योग्य आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजनाला जाणार होते. मात्र मराठा समाजाने विरोध केला. आता अजित पवार येणार नाहीत असे अधिकृत कारखान्याकडून सांगण्यात आलं आहे. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते मोळी पूजन होणार आहे.


माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजेसाठी अजित पवार बारामतीत जाणार होते. दुपारी एक वाजता हा मोळी पुजनाचा कार्यक्रम पार पडणार होता. त्यांचा हा नियोजित कार्यक्रम होता. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे अजित पवारांनादेखील बारामतीत येऊ दिलं जाणार नाही आणि आल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वीच माळेगाव पोलिसात निवेदन देत अजित पवारांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मराठा समाज, पोलीस आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांच्यात बैठकदेखील घेण्यात आली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. मराठा मोर्चाचे कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध कायम होता आणि आंदोलनावर मराठा मोर्चाचे कार्यकर्त्ये ठाम होते. 


कारखान्याची भूमिका काय?


अजित पवारांच्या दौऱ्यासंदर्भात आणि मराठ्यांच्य आंदोलनासंदर्भात माळेगाव कारखाना संचालक योगेश जगताप म्हणाले की,  आमचा आंदोलनाला पाठींबा आहे. मोळी पूजन झाले की आम्ही आंदोलनात जाऊन सामील होऊ.अजित पवारांनी आधीच तारीख दिली होती. जरांगे पाटील यांचे आंदोलन 25 ला सुरू झाले. त्यामुळे हा कार्यक्रम कसा रद्द होऊ शकेल?, असा सवाल त्यांन उपस्थित केला होता.  त्यासोबतच मोळी पूजन केल्यावर अजित पवार सभा घेतील. हा कार्यक्रम मराठा समाजाला डीवचण्याचा नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात अजित पवारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आंदोलकांनी अजित पवारांशी चर्चा  करावी. एक वेगळा आदर्श घालून द्यावा आणि त्याची सुरुवात बारामतीतून करावी अशी विनंती जगताप यांनी केली होती. मात्र कार्यकर्त्यांचा रोष पाहता अजित पवारांनी बारामती दौरा रद्द केला आणि संचालकांनी अजित पवार येणार नसल्याची माहिती दिली. 


मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक...


अजित पवारांनी मोळी पुजनाला येऊ नये, अन्यथा आंदोलन करु असा इशारा मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. आज सकाळपासून मराठा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या शेतकरी पुतळ्यावर ठिय्या मांडला होता. शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. अजित पवार बारामतीत येऊच द्या त्यांची गाडीदेखील कारखान्याच्या दिशेने सोडली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा  मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा आणि जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे, असे फलक घेत कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. 


शरद पवार काय म्हणाले?


शरद पवारांनी मुंबईतील  पत्रकार परिषदेत  अजित पवारांच्या बारामतीतील रद्द झालेल्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी माळेगावला जाणं टाळलं हे योग्य आहे. वातावरण गरम असताना तिथं न जाणं हेच योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.


 पोलिसांचा तगडा बंदोबस्त 


अजित पवारांच्या दौऱ्यावेळी अनुचित प्रकार घडू नये आणि यासाठी कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तब्बल 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मराठ्यांनी घोषणाबाजी करु नये, असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


सरकार बघ्याची भुमिका घेतंय? असा प्रश्न मला पडलाय; मराठा आरक्षणावर शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया