मुंबई : पुण्याचा बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिक हा महाराष्ट्राचा आजवरचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी अभिमन्यूने ही किमया साधली आहे.

नाशिकचा विदित गुजराथी वयाच्या अठराव्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता. 11 फेब्रुवारी 2000 रोजी जन्म झालेल्या अभिमन्यूने वयाची 17 वर्ष सहा महिने आणि 19 दिवस पूर्ण करत बुद्धिबळातला सर्वोच्च मानाचा किताब पटकावला.

हा विक्रम रचणारा अभिमन्यू भारताचा 49 वा, तर महाराष्ट्राचा सातवा ग्रँडमास्टर ठरला आहे. ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म अभिमन्यूनं अबुधाबीतल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत
मिळवला.

अभिमन्यू हा पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये बारावीत शिकत असून, गेली दहा वर्षे तो जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचा सराव करत आहे.