नवी दिल्लीः ऑलिम्पिक ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारी अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. मात्र या स्पर्धेदरम्यान अनेक असे किस्से घडतात जे अनेक वर्ष उलटूनही लक्षात राहतात.


 

ऑलिम्पिक स्पर्धेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे ही स्पर्धा राजकारणाच्याही पलिकडे आहे. काही स्पर्धा सुरक्षेच्या कारणांमुळे तर काही खेळाडूंनी गाजवल्या.

 

ऑलिम्पिकमधील आतापर्यंतचे काही अविस्मरणीय किस्सेः

म्युनिक 1972: जर्मनीमध्ये झालेली ही स्पर्धा जर्मनीला जगाला आपली ओळख सिद्ध करुन देण्याची सुवर्ण संधी होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही स्पर्धा चांगलीच गाजली. या स्पर्धेत पेलिस्टिनियन अतिरेक्यांनी हल्ला करत ईस्त्राईलच्या ग्रुपला ओलीस ठेवलं आणि याबदल्यात त्यांच्या 234 कैद्यांना सोडवण्याची अट ठेवली. मात्र पश्चिम जर्मन सरकारने ही अट फेटाळली आणि अतिरेक्यांनी 6 प्रशिक्षक, 5 खेळाडू आणि एका जर्मन अधिकाऱ्याचा खात्मा केला.

 

मॉस्को 1980 आणि लॉस एंजेलिस 1984: अतिरेक्यांकडून स्पर्धा कशी हायजॅक केली जाऊ शकते, याचा प्रत्यय म्युनिकच्या ऑलिम्पिक स्पर्धेत आला. तर सरकारकडूनच स्पर्धा हायजॅक केल्याचा अनुभव मॉस्को आणि लॉस एंजेलिस स्पर्धेत आला.

 

सोव्हिएतने अफगाणिस्तानच्या सैनिकांना सोडलं नाही तर अमेरिका मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकेल, असा इशारा अमेरिकन सरकारने दिला. पण सोव्हिएतने हा इशारा न ऐकता अमेरिकेची मागणी फेटाळली आणि अमेरिकेसह 61 देशांनी मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. लॉस एंजेलिस 1984 च्या स्पर्धेतही हाच अनुभव आला.

 

बीजिंग ऑलिम्पिक 2008: चीनला ऑलिम्पिकचं यजमानपद मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा चीनचा आर्थिक निर्देशांक 1.3 एवढा होता. मात्र 2008 पर्यंत तो 4.6 ट्रिलीयन झाला. स्पर्धेच्या आयोजनावरुन ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली.

 

सोची 2014: रशियाने विंटर ऑलिम्पिकचं आयोजन केलं मात्र आर्थिक कारणांमुळे ही स्पर्धा चर्चेत आली. स्पर्धा भरवण्यासाठी उन्हाळ्यात हिवाळ्याचं वातावरण तयार करण्यासाठी 50 बिलीयन डॉलर एवढा खर्च येणार होता.

 

रिओ ऑलिम्पिकः रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच निर्वासित खेळाडूंना संधी देण्यात आली. जागतिक पातळीवर या निर्णयाची मोठी चर्चा झाली. माध्यमांच्या बसवर गोळीबाराची घटनाही या स्पर्धेत घडली. तर काही खेळाडूंनी मैदान गाजवलं. अशा विविध कारणांमुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली.