Footballer Pele Health update : एकीकडे  फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) स्पर्धा उत्साहाता सुरु असताना फुटबॉल जगत मात्र ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहे. पेले कर्करोगाशी लढा देत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोविड संसर्गाच्या उपचारासाठी मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविडमुळे वाढलेल्या श्वसन संसर्गाच्या उपचारासाठी पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 82 वर्षीय पेले यांच्या प्रकृतीला आता अधिक धोका नसल्याचे शनिवारी रुग्णालयाकडून सांगण्यात आले.


हॉस्पिटलने शनिवारी सांगितले की पेले उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत आणि गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली आहे. पेले यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या मित्रांनो, मला सर्वांना शांत आणि पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवायचे आहे. मी आशावादी असून नेहमीप्रमाणे माझ्या उपचारांचं पालन करत आहे.'' दरम्यान पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने मीडियाला दिलेल्या माहितीत सांगितले की, "ते आजारी आहेत, ते वृद्ध असून आता कोरोनाच्या संसर्गामुळे ते इथे आहेत. त्यांना बरं वाटायला लागलं. की ते लवकरच पुन्हा घरी जाणार आहेत.






पेलेंचे अवयव काम करणं झालं होतं बंद


याआधी काही दिवसापूर्वी समोर आलेल्या माहितीत पेले यांच्या शरीराच्या अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. त्यानंतर त्यांना एंड-ऑफ-लाइफ केअरमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्व फुटबॉल जगत पेलेंसाठी प्रार्थना करताना दिसत होते. याआधी त्यांना 30 नोव्हेंबर रोजी अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं.  तेव्हापासून त्यांना सतत रुग्णालयात यावं जावं लागत आहे. पण या सर्वात आता त्यांची प्रकृती काहीशी ठिक असल्याची एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 


हे देखील वाचा-