Mohammad Rizwan : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी विशेष नव्हती आणि त्यांनी केवळ चार सामने जिंकले. खराब कामगिरीनंतर बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. यानंतर काही वेळातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शाहीन आफ्रिदीला T20 चे कर्णधार आणि शान मसूदला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले.


आता पीसीबीने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून मोहम्मद रिझवानला टी-20 संघाचा उपकर्णधारपदी संधी दिली आहे. पीसीबीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये रिझवान मोठी जबाबदारी पार पाडणार आहे. 12 ते 21 जानेवारी दरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.


मोहम्मद रिझवान हा टी-20 क्रिकेटमधील पाकिस्तान संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. बाबरने कर्णधारपद सोडले तेव्हा त्याला टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बनवले जाईल असे बोलले जात होते, मात्र पीसीबीने ही जबाबदारी शाहीनला दिली. 31 वर्षीय रिझवानने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 85 टी-20 सामन्यांमध्ये 49.7 च्या सरासरीने 2797 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 25 अर्धशतके झळकावली.


न्यूझीलंड मालिकेसाठी पाकिस्तानचा T20 संघ


शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, आझम खान (विकेटकीपर), बाबर आझम, फखर जमान, हरिस रौफ, हसीबुल्ला (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान. (यष्टीरक्षक/उपकर्णधार), मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, उसामा मीर, जमान खान.


पाकिस्तान-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक



  • पहिला T20- 12 जानेवारी, ऑकलंड

  • दुसरा T20- 14 जानेवारी, हॅमिल्टन

  • तिसरा T20- 17 जानेवारी, ड्युनेडिन

  • चौथा T20- 19 जानेवारी, क्राइस्टचर्च

  • पाचवा T20- 21 जानेवारी, क्राइस्टचर्च


पाकिस्तानच्या  विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीमुळे स्पर्धेच्या मध्यावरच प्रतिक्रिया येऊ लागल्या. सर्वप्रथम पाकिस्तान संघाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हितसंबंधांच्या संघर्षाचाही आरोप आहे. यानंतर पाकिस्तानचा संघ शेवटचा सामना खेळून मायदेशी परतला तेव्हा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला. इंझमामच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वहाब रियाझ यांची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली. तर माजी कर्णधार मोहम्मद हाफिजची पाकिस्तान संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या