Sanjay Raut शिर्डी : नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आदलाबदली संदर्भात अद्याप काहीही चर्चा झाली नाही. मात्र शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) त्या जागेसाठी योग्य आणि प्रबळ उमेदवार असल्याचे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. 


नाशिक येथील दौरा आटोपून संजय राऊत थेट शिर्डीला साई दर्शनाला (Shirdi Sai Mandir) पोहोचले. साईंच्या दर्शनानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मी महाराष्ट्रातील स्वाभिमानी राजकारणी आहे. राज्यावर सध्या जे संकट आहे ते दूर व्हावे. महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा. शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांना चांगले दिवस येण्यासाठी राज्यात चांगले सरकार यावे यासाठी संजय राऊत यांनी साई चरणी प्रार्थना केली, असे त्यांनी म्हटले. 


शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या वाढतेय


शिर्डी लोकसभेबाबत संजय राऊत म्हणाले की, ठाकरे गट वैगरे आम्ही मानत नाही. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या वाढत आहे. याचा अर्थ मुळ शिवसेनेकडे ताकद आहे. आमची जिंकण्याची क्षमता किती आहे, हे सर्वांना माहिती असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. 


विखे पाटलांना टोला


संजय राऊत यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार टोला लगावला."विखे पाटील महसूल नाही तर आमसूल मंत्री आहेत.", असे विधान त्यांनी केले. 


प्रभावती घोगरे विखे विरोधक उमेदवार?


दरम्यान, शिर्डीत खासदार संजय राऊत दाखल होताच विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या प्रभावती घोगरे या त्यांच्या स्वागताला उपस्थित होत्या. त्यामुळे भविष्यातील विखे विरोधक उमेदवार आहेत का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. प्रभावती घोगरे यांना ठाकरे गटाकडून विखे पाटलांविरोधात उमेदवारी मिळणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


तर महाराष्ट्राचे कसे होणार?


महानंद डेअरीचे चेअरमन राजेश परजणे यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, तुम्ही काय इतक्या वर्ष डोक्यावरचे केस उपटत होता काय? संस्था चालवता आली नाही म्हणून NDDB कडे देण्याची वेळ आली. लोकांचे पगार नाही, उत्पादन क्षमता घटली, वितरण कमी झाले याला जबाबदार कोण? तुमच्या खाजगी डेअरी व्यवस्थित चालवता. सरकारची संस्था चालवत नाही. तुमच्या 27 एकर जमिनीवर काही लोकांचा डोळा आहे. चेअरमन परजणे यांच्यावर टिका करण्याचे माझे काही कारण नाही.मात्र राज्यातील उद्योग आणि संस्था गुजरातकडे गेली तर महाराष्ट्राचे कसे होणार? असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा 


22 जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करतो फक्त मोदींनी हजार रुपये द्यावे, प्रकाश आंबेडकरांचा टोला