हैदराबादः पॅरालिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनाही पुढच्या वर्षीपासून खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात येईल, अशी घोषणा क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केली आहे. शनिवारी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीच्या भेटीदरम्यान क्रीडामंत्र्यांनी ही माहिती दिली.


पॅरालिम्पिक खेळाडू पदक जिंकून देशाचं नाव जगभरात अभिमानाने उंचवतात. त्यामुळे त्यांनाही ऑलिम्पिक खेळाडूंप्रमाणेच सन्मान मिळणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षीपासून पॅरालिम्पिक खेळाडूंचीही खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.

ऑलिम्पिक खेळाडूंप्रमाणेच पॅरालिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत होती. धावपटू मिल्खा सिंह यांनीही यासाठी आवाज उठवला होता.