मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात आपल्या वयाचा खुलासा केला खरा, पण त्याच्या वयाचं कोडं सुटण्याऐवजी आणखीच गडद झालं आहे. एकतर आफ्रिदीच्या जन्मतारखेत घोळ आहे किंवा त्याचं गणित कच्चं आहे, हेच त्याच्या दाव्यावरुन समोर येतं.

'गेम चेंजर'मध्ये शाहिद आफ्रिदी म्हणतो की, "माझा जन्म 1975 मध्ये झाला होता, 1980 मध्ये नाही. याचाच अर्थ 1996 मध्ये नैरोबीमध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात त्याने विक्रमी 37 चेंडूंमध्ये शतक ठोकलं होतं, त्यावेळी तो 16 वर्षांचा नव्हता.

"मी फक्त 19 वर्षांचा होतो, 16 वर्षांचा नाही, जसा त्यांनी दावा केला होता. माझा जन्म 1975 मध्ये झाला. त्यामुळे होय, अधिकाऱ्यांनी माझं वय चुकीचं लिहिलं," असं शाहिद आफ्रिदीने 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात लिहिलं आहे.

VIDEO | 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून आफ्रिदीचं 'बूम बूम' नामकरण



मात्र 19 वर्षांचा असल्याचा आफ्रिदीचा दावा भ्रम निर्माण करणारा आहे. कारण 1975 मध्ये जर त्याचा जन्म झाला असेल, तर विक्रमी शतकाच्या वेळी त्याचं वय 21 वर्ष असायला हवं, 19 वर्ष नाही. त्यामुळे सर्वात तरुण फलंदाज म्हणून आफ्रिदीने नोंदवलेले सर्व विक्रम आज आणि त्या त्या वेळीही खोटे होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

16 वर्ष 217 दिवस वय असताना शाहिद आफ्रिदीने श्रीलंकेविरुद्ध 1996 मध्ये 37 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यावेळी सर्वात कमी वयात जलद शतक करणारा फलंदाज तो बनला होता. आफ्रिदीनंतर सर्वात कमी वयात शतक बनवण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या उस्मान गणीच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 17 वर्ष 242 दिवस वयात वन डे क्रिकेटमध्ये शतक ठोकलं होतं.

आता आफ्रिदीनेच त्याचं वय जास्त असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर राहायला हवा का हा प्रश्न आहे. मात्र आयसीसी कागदपत्रं मागते. कागदपत्रांनुसार त्याचं वय 1 मार्च 1980 आहे आणि आत्मचरित्रानुसार, त्याचा जन्म 1975 मध्ये झाला होता.

शाहिद आफ्रिदीने 27 कसोटी, 398 वन डे आणि 99 ट्वेण्टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2016मध्ये टी20 विश्वचषकानंतर आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसवर निशाणा साधला आहे.

VIDEO | विराटने कर्णधार म्हणून सुधारणा करण्याची गरज : आफ्रिदी