मुंबई : भारतीय किनारपट्टीकडे सरसावलेले फनी चक्रीवादळ आज सकाळी 10 ते दुपारी 12 च्या दरम्यान ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. फनी चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी युद्ध स्तरावर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.


फनी चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची 81 पथके तैनात करण्यात आली आहेत. 223 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळावरुन हवाई वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओडिशा सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष ठेवून आहेत.

फनी चक्रीवादळामुळे हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांना सतर्कतेचा इशारा जाहीर केला आहे. तसेच पर्यटकांना पुरी शहर सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर एनडीआरएफ आणि नौदलाला सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

फनी वादळामुळे शेतीसह रस्त्यांचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ओदिशाच्या किनारपट्टी भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.