इस्लामाबाद : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय जनतेच्या मनात पाकिस्तानविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळेच आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरोधात सामना खेळू नये, अशी मागणी सध्या देशभरातून होत आहे. या प्रकरणावर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद म्हणाला की, "भारतात राजकीय स्वार्थासाठी क्रिकेटला लक्ष्य केले जात आहे."


जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पाकिस्तान या दहशतवाद्यांना पाठिशी घालत असल्याने भारताने पाकिस्तानची सर्व स्तरांवर कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याचाच एक भाग म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये अशी मागणी देशभर होत आहे.

सरफराज अहमद याबाबत म्हणाला की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातला विश्वचषकातला सामना आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार खेळवायला हवा. जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक या सामन्याची वाट पाहत आहेत. राजकीय फायद्यासाठी क्रिकेटला लक्ष्य करणे योग्य नाही. क्रिकेट हा खेळ आहे, त्यामुळे भारताने खिलाडूवृत्तीने हा खेळ खेळावा. परंतु भारतात मात्र यावरुन राजकारण केलं जात आहे. पाकिस्तानमध्ये असं होत नाही. पाकिस्तानमध्ये राजकीय लोकांकडून खेळात हस्तक्षेप केला जात नाही.

विश्वचषकाच्या साखळीत 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर भारतातलं वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे या सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

VIDEO | पाहा सचिन काय म्हणतोय INDvsPAK सामन्याबद्दल



भारतात दोन गट
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावरुन भारतीय नागरिक, राजकारणी आणि माजी क्रिकेटर दोन गटात विभागले गेले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंह यांच्या म्हणण्यानुसार भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये. तर दुसऱ्या बाजूला महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या मते भारत जर पाकिस्तानविरोधात सामना खेळला नाही. तर पाकिस्तानला फुकटचे दोन गुण मिळतील आणि आपले वजा होतील. त्यापेक्षा भारताने हा सामना खेळावा, पाकिस्तानला हरवावं आणि गुणही मिळवावेत. पाकिस्तानला हरवण्यात वेगळीच मजा आहे. हा सामना जिंकून भारतीय खेळाडुंनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करावी.