मुंबई : घटस्फोट घेतल्यानंतर 16 वर्षांनी अभिनेत्री पूजा बेदीला अखेर तिला प्रिन्स चार्मिंग मिळाला आहे. 48 वर्षीय पूजा बेदीने बॉयफ्रेण्ड मानेक काँट्रॅक्टरसोबत साखरपुडा केला आहे. दोघे यंदाचा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मानेक काँट्रॅक्टरने पूजाला व्हॅलेन्टाईन्स डेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला प्रपोज केलं होतं. तो तिला हॉट-एअर बलून राईडसाठी घेऊन गेला होता आणि तिथेच त्याने पूजाला लग्नाची मागणी घातली. वर्षभरापासून दोघे एकमेकांना डेट करत होते.

पूजा बेदी आणि मानेक काँट्रॅक्टर शाळेपासूनचे मित्र आहे. हिमाचल प्रदेशच्या द लॉरेन्स स्कूल सनावर इथे दोघांचं शिक्षण झालं. शाळेत मानेक पूजाला सीनियर होता. मात्र नंतर ते आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. मानेक काँट्रॅक्टर मूळचा गोव्याचा आहे. मागील वर्षी पुन्हा त्यांची भेट झाली. दोघांमध्ये प्रेम झालं आणि आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.


मुलगा आणि मुलीच्या सुट्टीच्या हिशेबाने लग्नाचं प्लॅनिंग करणार असल्याचं पूजाने सांगितलं. मुलगी आलिया तिच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यक्त आहे. तर मुलगा उमर इब्राहिम कॉलेजमध्ये आहे. दोघांच्या सुट्टीनंतर लग्नाची तारीख निश्चित होईल, असं तिने सांगितलं.

वडील कबीर बेदींच्या चौथ्या लग्नाबाबत पूजा म्हणते...

पूजा बेदीचं हे दुसरं लग्न असेल. 1994 मध्ये तिने पहिलं लग्न केलं होतं. आता 25 वर्षांनी ती पुन्हा एकदा नवरी बनणार आहे. तिच्या पहिल्या पतीचं नाव फरहान इब्राहिम फर्निचरवाला आहे. संबंधांमध्ये कटूता आल्याने दोघांनी 2003 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.

पूजा बेदीची मुलगी आलिया बॉलिवूडमध्ये, सैफसोबत सिनेमा

पूजा बेदी ही अभिनेता कबीर बेदी यांची मुलगी आहे. तिने 'जो जीता वही सिकंदर', 'लुटेरे', 'आतंक ही आतंक', 'फिर तेरी कहानी याद आई' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्येही सहभागी झाली होती. त्याआधी तिने 'झलक दिखला जा'च्या पहिल्या मोसमात भाग घेतला होता. तर 'नच बलिया 3' मध्येही तिचा समावेश होता. पूजा केवळ अभिनेत्रीच नाही तर लेखिकाही आहे.