मुंबई : भारतीय महिलांनी इंग्लंडचा अख्खा डाव 41 षटकात अवघ्या 136 धावांत गुंडाळून, मुंबईतल्या पहिल्या वन डेत 66 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारताने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


त्याआधी इग्लंडने नाणेफेर जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची मधली फळी कोसळली. त्यामुळे 49.4 षटकात भारताला सर्व बाद 202 धावांचीच मजल मारता आली होती. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्सने 48 आणि कर्णधार मिताली राजने 44 धावांची खेळी उभारली.

यानंतर 203 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या. डावखुरी स्पिनर एकता बिश्तने 25 धावांत चार विकेट्स काढून भारतीय महिलांच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. ऑफ स्पिनर दीप्ती शर्मा आणि वेगवान गोलंदाज शिखा पांडेने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून आपली कामगिरी चोख बजावली.