मुंबई : पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदी हा आता त्याच्या जीवनातील एका नव्या प्रवासाला सुरुवा करणार आहे. खासगी आयुष्यात त्याची बढती होणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण, आफ्रिदी हा लवकरच पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याचा सासरा होणार आहे. शाहिदची मुलगी अक्सा हिच्याशी शाहीनचा विवाहसोहळा पार पडणार आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार अक्सा आणि शाहीन यांचा साखरपुडा पार पडणार आहे. इतकंच नव्हे, अक्साचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच या दोघांचा विवाहसोहळा अर्थात निकाह पार पडणार आहे. पाकिस्तानी पत्रकार एहतिशाम उल हक यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. ट्विट करत त्यांनी लिहिलं, 'दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याची कबुली दिली असून लवकरच शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा साखरपुडा होणार आहे. दोघांच्या साखरपुड्यानंतर दोन वर्षातच लग्न होणार आहे. अक्साचं शिक्षण पूर्ण होताच त्यांचे लग्न होईल.'


IND vs ENG: कसोटी मालिका समाप्त होताच अश्विनच्या पत्नीचं भावनिक ट्विट


दरम्यान, शाहीन आणि शाहिद यांना नुकतंच पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2021 मध्ये खेळताना पाहायला मिळालं होतं. पण, कोरोना संक्रमणाचं संकट पाहता ही स्पर्धा 14 सामन्यांनंतरच रद्द करण्यात आली होती. शाहीननं या स्पर्धेत अवघ्या 4 सामन्यांमध्ये 9 विकेट मिळवले होते. त्याच्या या प्रदर्शनाची क्रीडा वर्तुळात बरीच चर्चा पाहायला मिळाली होती.





शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानी संघातील एक युवा खेळाडू आहे. अवघ्या 20 वर्षांच्या शाहीननं 15 कसोटी सामन्यांमध्ये 48 विकेट आपल्या नावे केले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्येही 22 सामन्यांमध्ये त्यानं 45 विकेट मिळवले आहेत. त्यामुळं त्याच्याकडे पाकिस्तानी क्रिकेटपटूही मोठ्या आशेच्या नजरेनं पाहतात.