कार्डिफमधल्या या उपांत्य सामन्यावर पाकिस्ताननं अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पाकिस्ताननं हा सामना 77 चेंडू आणि आठ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात पाकिस्ताननं यजमान इंग्लंडचा अख्खा डाव अवघ्या 211 धावांत गुंडाळला.
सलामीवीर अझर अली आणि फखर झमाननं 118 धावांची मजबूत भागीदारी रचली. याच भागीदारीच्या जोरावर पाकिस्ताननं विजयी लक्ष्य गाठलं.
अझर अलीनं 76 आणि फखर झमाननं 57 धावांची खेळी उभारली. तर बाबर आझमनं नाबाद 38 आणि मोहम्मद हफिजनं नाबाद 31 धावांची खेळी करून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान, सेमीफायनलचा दुसरा सामना उद्या (गुरुवार) भारत आणि बांगलादेशमध्ये होणार असून या सामन्यात जो जिंकेल त्याला फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडावं लागणार आहे.