नवी दिल्ली : सुलभ इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेने हारियणातील काही गावांचा विकास करण्यासाठी दत्तक घेतली असून, यातील एका गावाचं नामकरण ट्रम्प गाव करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी वॉशिंग्टनमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी केली.


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुलभ इंटरनॅशनल ही संस्थान हारयणाच्या मेवात जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असून, या गावाला हागणदारीमुक्त करण्यासाठी काम सुरु आहे. तसेच यातील एका गावाचं नामकरण ट्रम्प गाव असं करण्यात येणार आहे.

बिंदेश्वर पाठक यांनी याबाबत सांगितलं की, केंद्र सरकारकडून स्वच्छतेसाठी मोहीम सुरु असून, त्याअंतर्गतच आमची संस्था काम करत आहे. मी स्वत: यासाठी लवकरच मेवात जिल्ह्याचा दौरा करुन, ग्रामीण भागातील नागरीकांशी चर्चा करणार आहे.

यावेळी पाठक यांनी कॉर्पोरेट जगतालाही या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसेच यासाठी ते गाव दत्तक घेऊन, त्याचा कायापालट करु शकतात, असंही सांगितलं.