मुंबई : कोल्हापूरच्या पठ्ठ्यांनं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक खेचून आणलं असून नेमबाजीत देशाचं नाव जगभरात उंचावलं आहे. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris 2024 Olympics)  स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) यांने दमदार कामगिरी करत बाजी मारली आहे. 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात  स्वप्नीलने कांस्य पदक पटकावलं आहे. 


स्वप्नीलचा विजय जितका मोठा आहे, तितकाच मोठा त्याचा संघर्षदेखील आहे. मागील 10-12 वर्षांपासून स्वप्नील अहोरात्र मेहनत घेतोय. स्वप्नीलला इथंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी मोठे कष्ट घेतलेत. सरावासाठी देखील स्वप्नीलकडे पैसे नव्हते. नेमबाजीसाठी लागणाऱ्या बुलेट्सची किंमत त्यांच्या अवाक्या पलीकडची होती. सरावासाठी स्वप्नीलच्या वडिलांनी बँकेकडून कर्ज काढलं... एक-एक पई जमा केली, आणि वडिलांच्या याच कष्टाचं त्याने चिज केलंय.  स्वप्नीलच्या पराक्रमाने कोल्हापूरकरांसह देशवासीयांची मान उंचावली आहे.स्वप्नीलचं सर्वत्र कौतुक होतय, त्याला वेगवेगळी पारितोषकं जाहीर होतायत.


Who is Swapnil Kusale : स्वप्नील कुसाळेचा संपूर्ण प्रवास


नेमबाज स्वप्नील कुसाळे हा कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीतला आहे. स्वप्नीलचा जन्म 6 ऑगस्ट 1995 रोजी पुण्यात झालाय. स्वप्नीलच्या कुटुंबात आई, वडील आणि एक भाऊ आहे. स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. 



  • सन 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राला खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने 12वीच्या परीक्षेकडे कानाडोळा केला. 

  • 14 वर्षांचा असताना स्वप्नीलच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. 

  • 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी स्वप्नीलचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.

  • नाशिक आणि पुण्यात स्वप्नीलने नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलं. 2012 पासून स्वप्नील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 

  • स्वप्नील कुसळे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे.

  • क्रिकेटपटू एमएस धोनी यांच्या आयुष्यासारखाच स्वप्नीलचा संघर्ष आहे.

  • 2015 साली कुवेतमध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रो 3 स्पर्धेत स्वप्नीलने सुवर्णपदक जिंकले.

  • या सुवर्णपदकानंतर त्याला भारतीय रेल्वेमध्ये टीसीची नोकरी देण्यात आली. 

  • 2018 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही स्वप्निलने कांस्यपदक मिळवले. यानंतरच्या स्वप्निलच्या नावाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊ लागली. 

  • तिरुअनंतपुरममधील 61 व्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने यशाची पुनरावृत्ती केली आणि 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत आणखी एक सुवर्णपदक जिंकले.

  • 2022 साली कैरो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत स्वप्नीलने चौथे स्थान मिळवले आणि भारतासाठी ऑलिम्पिक कोटा मिळवला.

  • 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि बाकू येथे 2023 विश्वचषक स्पर्धेत मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तसेच वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत दोन रौप्यपदके जिंकली.

  • नुकत्याच पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.

  • ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. ही तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत.


1952 सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. तसाच पराक्रम करणारा स्वप्नील हा दुसरा मराठमोळा खेळाडू बनला आहे. 


ही बातमी वाचा :