Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला.  इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले. 


Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, ग्रेट ब्रिटनचा 4-3 नं मिळवला विजय


सामन्याच्या सुरुवातीला ब्रिटननं आक्रमक खेळी केली.  ब्रिटननं सामन्यात 2-0नं आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं सलग तीन गोल करत 3-2 अशी आघाडी घेतली. मात्र ही आघाडी भारतीय महिलांना टिकवता आली नाही. ब्रिटननं पुन्हा वापसी करत सलग दोन गोल डागले आणि 4-3 अशी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत गेल्यावेळच्या गोल्ड मेडल विनर ग्रेट ब्रिटननं कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केलं.


ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला होता.  टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली होती. ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं केला होता.  भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून 2-1 ने पराभूत व्हावे लागले होते.