Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला परभाव मागे सारत मंगळवारी स्पेनचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. भारतानं स्पेनला 3-0 अशा फरकानं नमवलं. भारतानं पहिले दोन गोल पहिल्या क्वॉर्टरमध्ये डागला, तर तिसरा गोल शेवटच्या क्वॉर्टरमध्ये डागला. स्पेनचा संघ आठ पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही गोल करण्यात अयशस्वी ठरला. भारतानं विजयासह पुल ए मध्ये आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. सध्या भारत ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी कायम आहे. 


भारत आणि स्पेन यांच्यातील सामन्याचा निर्णय 4 क्वॉर्टरनंतर झाला आहे. तसं पाहायला गेलं तर भारतानं आपल्या विजयावर मोहोर सामन्याच्या पहिल्या क्वॉर्टरमध्येच उमटवली होती. भारतीय हॉकी संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी खेळताना दिसून आला. 



भारतानं पहिल्या क्वॉर्टरमध्ये डागले दोन गोल 


भारताकडून पहिल्या क्वॉर्टरमध्येच सिमरनजीत सिंहने 14व्या मिनिटाला गोड डागला. या गोलसोबत भारतानं सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच ऑलिम्पिकमधील सिमरनजीतचा हा पहिला गोल ठरला. त्यानंतर पुढच्या एका मिनिटाच्याच आत भारताला एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. ज्यावर रुपिंदर पाल सिंहने गोल डागत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 


दुसरा आणि तिसरा क्वॉर्टर गोलरहित 


दरम्यान, सामन्याच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये गोलचा डबल डोस पाहायला मिळाला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये मात्र दोन्ही संघ आक्रमक खेळी करताना दिसून आले. तिसऱ्या क्वॉर्टरच्या शेवटच्या सेकंदाला स्पेननं एक गोल डागला, पण तोपर्यंत वेळ हातून निघून गेली होती. तिसरा क्वॉर्टर संपला होता. त्यामुळे स्पेननं डागलेला गोल व्यर्थ गेला. त्यावेळी स्पेननं पेनल्टी कॉर्नरची मागणी करत रिव्ह्यू घेतला. स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण स्पेनचा संघ गोल डागण्यात अयशस्वी ठरला. 


चौथ्या क्वॉर्टरमध्ये डोग डागत भारताचा एकतर्फी विजय 


भारतानं पेनल्टी कॉर्नरच्या चौथ्या क्वॉर्टरमध्ये गोल डागण्याची संधी हातून जाऊ दिली नाही. भारताकडून सामन्याच्या 51व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंहनं गोल केला. या सामन्यातील रुपिंदर पाल सिंहचा हा दुसरा गोल होता. या गोलसह भारतानं सामन्या 3-0 अशी आघाडी घेत, आपला विजय निश्चित केला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India vs Sri Lanka : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आज दुसरा टी20 सामना; मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज