Tokyo State Emergency: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी लागू (japanese Prime Minister announces state emergency Tokyo )करण्यात आली आहे. टोकियोमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं ऑलिम्पिक खेळांचा आनंद प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लुटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळं पुढे ढकलली होती. आता ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी काल म्हटलं होतं की, जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजनांसह सज्ज आहोत.
बुधवारपासूनच जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याबाबत माहिती समोर येऊ लागली होती. आज पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान आणीबाणी लागू केली आहे. काल बुधवारी तज्ञांसोबत त्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी सोमवारपासून 22 ऑगस्टपर्यंत टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर अखेर आज आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच होणार असल्याचं स्पष्ट
ऑलिम्पिक खेळांचं आयोजन 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होत आहे. या ऑलिम्पिकसाठी विदेशी प्रेक्षकांना येण्यासाठी आधीच बंदी घातली होती. मात्र आता आणीबाणी लागू केल्यामुळं टोकियोमधील स्थानिक प्रेक्षकांना येण्यास देखील बंदी असणार आहे. त्यामुळं यंदाचं ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सतत वाढत आहेत कोरोना केसेस
मागील काही दिवसांपासून टोकियोमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गुरुवारी टोकियोमध्ये कोरोनाचे 896 रुग्ण समोर आले. तर बुधवारी टोकियोत 920 रुग्णांची नोंद झाली होती. 13 मे नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर आल्याने सरकारची चिंता वाढली आहे.