नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक सुरु होण्याअगोदर भारतीय अॅथलेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय धावपटू हिमा दासने मंगळवारी (6 जुलै) दुखापतीमुळे आपण टोकियो ऑलिम्पिकची संधी गमावणार असल्याचे जाहीर केले आहे.


हिमा दासने तिच्या ट्विटर हँडलवर ही घोषणा करत लिहलंय की, "मी माझ्या नवीन इव्हेंट 100 मी आणि 200 मीटर मधील पात्रता फेरी पूर्ण करण्याच्या जवळ असताना अचानक उद्वभवलेल्या दुखापतीमुळे माझं पहिलं ऑलिम्पिक गमावलंय. मी माझ्या प्रशिक्षकांचे, सपोर्ट स्टाफ आणि माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानते.




हिमा दासनेही आपल्या चाहत्यांना वचन दिलंय की ती जोरदार पुनरागमन करेल आणि आता तिचे राष्ट्रकुल खेळ, आशियाई गेम्स आणि 2022 मध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेकडे लक्ष लागले आहे.


हिमा दासला काय झालंय?
स्टार धावपटू हिमा दासला शनिवारी सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर धावताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तिला आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही. बऱ्याच काळापासून पाठीच्या दुखापतीमुळेही हिमा दास त्रस्त आहे.