Sumit Antil Wins Gold Medal Javelin Throw Paralympics 2024: पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू सुमित अंतिलने (Sumit Antil) विक्रमी कामगिरी करताना सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले. यासह सुमित अंतिल सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे.
पुरुषांच्या F64 प्रकारात 70.59 मीटर भालाफेक करून सुमित अंतिलने (Sumit Antil) सुवर्णपदक जिंकले आणि पॅरालिम्पिकचा विक्रमही मोडला. याआधीही पॅरालिम्पिकचा (Paris Paralympics 2024) विक्रम सुमितच्या नावावर होता. सुमितने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 68.55 मीटर भालाफेक करून विक्रम केला होता. सुमितने दुसऱ्याच प्रयत्नात विजयी फेक करत प्रतिस्पर्ध्यांना संधीच दिली नाही.
सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले
सुमित अंतिलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 68.55 मीटर अंतरासह सुवर्णपदक जिंकले. या सामन्यात त्याने टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम तीनदा मागे टाकला कारण पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नाव्यतिरिक्त त्याने पाचव्या प्रयत्नात 69 मीटरचा टप्पाही पार केला. श्रीलंकेच्या दुलानने 67.03 मीटरच्या प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बुरियनने 64.89 मीटरच्या प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले.
सुमित अंतिलच्या नावावरही विश्वविक्रम
सुमित अंतिल भालाफेकच्या F64 श्रेणीचा बादशाह बनला आहे. केवळ पॅरालिम्पिकच नाही तर या स्पर्धेचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. 2022 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने 73.29 मीटर भालाफेक करून नवा विश्वविक्रम केला होता. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा यशस्वीपणे बचाव करणारा अवनी लेखरानंतर तो आता फक्त दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हे दोन्ही खेळाडू टोकियो आणि आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
योगेश कथुनियाला थाळीफेकीत रौप्य
योगेश कथुनियाने सलग दुसऱ्यांदा पुरुषांच्या एफ 56 प्रकारात 42.22 मीटर अशी सत्रातील सर्वोत्कृष्ट थाळीफेक करीत सोमवारी रौप्यपदक जिंकले. 29 वर्षांच्या या खेळाडूने टोकियोमध्येही रौप्य जिंकले होते. ब्राझीलचा 45 वर्षांचा क्लॉडनी बतिस्टाने पाचव्या प्रयत्नांत 46.86 मीटरचा नवा विक्रम नोंदवून सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली.
तुलसीमतीला रौप्य
मनीषाला कांस्य बॅडमिंटनच्या महिला एकेरीत तुलसीमती मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांनी एसयू 5 प्रकारात क्रमशः रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरले. 22 वर्षांची अव्वल मानांकित तुलसीमती हिला फायनलमध्ये चीनची गत चॅम्पियन सँग कियू शिया हिच्याविरुद्ध 17-21, 10-21ने पराभव पत्करावा लागला.