Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने 10 मिनिटांत 2 पदके जिंकली आहेत. ज्यामुळे दुहेरी आकडा गाठला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू तुलसीमती मुरुगेसनने रौप्य पदक जिंकले. 2 सप्टेंबर (सोमवार) रोजी खेळल्या गेलेल्या महिला एकेरी वर्ग SU5 च्या फायनलमध्ये तुलसीमती मुरुगेसनला चीनच्या यांग क्विक्सियाकडून 17-21, 10-21 असा पराभव स्वीकारावा लागला. याच प्रकारात मनीषा रामदास हिने कांस्यपदक पटकावले. कांस्यपदकाच्या लढतीत मनीषा रामदासने डेन्मार्कच्या रोसेन्ग्रेन कॅथरीनचा 21-12, 21-8 असा पराभव केला. 






एका दिवसात बॅडमिंटनमध्ये 3 पदके


भारताच्या पदकांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. मुरुगेशन आणि मनीषा यांच्या यांच्याआधी नितेश कुमार यांनी बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SL3 प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. आजच, म्हणजे 2 सप्टेंबर रोजी नितेश कुमारने पुरुष एकेरी SL 3 गटाच्या अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बॅटलीचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे हे एकूण दुसरे सुवर्णपदक होते.






भारताच्या खात्यात आतापर्यंत 11 पदके


पॅरिस पॅरालिम्पिकच्या पाचव्या दिवशी भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. नितेश कुमार, तुलसीमती रामदास आणि मनीषा रामदास या तिघांनीही बॅडमिंटनमध्ये अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. यासह भारताने आता 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह एकूण 11 पदके जिंकली आहेत. भारत आता पदकतालिकेत 22 व्या स्थानावर आला आहे.






पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते



  • अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)

  • मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)

  • प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)

  • मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)

  • रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)

  • प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)

  • निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)

  • योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)

  • नितेश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)

  • मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)

  • तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)