Paralympics Rubina Francis : पॅरालिम्पिकमध्ये भारताने आणखी एक पदक जिंकले आहे. रुबिना फ्रान्सिसने भारतासाठी नेमबाजीत एकदम कडकमध्ये कांस्यपदकवर निशाणा साधला. रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या पदकांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत. याआधी रुबिना फ्रान्सिसने पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावले होते, मात्र अंतिम फेरीत तिने चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात तिने 211.1 गुण मिळवले आणि कांस्यपदक जिंकले.


पॅरिस पॅरालिम्पिकमधील नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक आहे. अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तर मोना अग्रवालने कांस्यपदक आणि यानंतर मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात रौप्य पदक जिंकले होते.






इराणच्या खात्तात सुवर्ण


या स्पर्धेत इराणच्या जावानमर्दी सारेहने सुवर्ण तर तुर्कीच्या ओझगान आयसेलने रौप्यपदक पटकावले. जावनमर्दी सारेहने 236.8 गुण मिळवले. तर ओझगन आयसेलने 231.1 गुण मिळवले. रुबिना एकेकाळी दुसऱ्या क्रमांकावर होती, पण नंतर ती मागे पडली.   .


कोण आहे रुबिना फ्रान्सिस?(who is Rubina Francis)


मध्य प्रदेशातील जबलपूर येथील पॅरा पिस्तुल नेमबाज रुबिना हिने जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स विश्वचषक - 2023 मध्ये 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. रुबिनाने 2017 मध्ये बँकॉक येथे झालेल्या जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ज्युनियर विश्वविक्रम केला होता. क्रोएशियामध्ये 2019 च्या जागतिक पॅरा चॅम्पियनशिपमध्येही तिने कांस्यपदक जिंकले होते.


25 वर्षीय रुबिनाला मुडदूस आहे आणि तिच्या पायात 40 टक्के अपंग आहे. मुडदूस हा एक हाडांचा आजार आहे. जी मुलांच्या हाडांच्या विकासावर परिणाम करतो. या आजारामुळे हाडांमध्ये वेदना आणि कमकुवतपणा येतो. रुबीना मध्य प्रदेश नेमबाजी अकादमीत पिस्तुल नेमबाजीचे प्रशिक्षण घेते.


पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते



  1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)

  2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)

  3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)

  4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)

  5. रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)