Paris Olympics 2024 Pakistan Arshad Nadeem: पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा (Paris Olympics 2024) संपून जवळपास 3 आठवडे उलटून गेले आहेत. परंतु पाकिस्तानसाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्शन नदीमला अजूनही विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आता अर्शद नदीमला पाकिस्तानमधील सर्वात मोठा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 


अर्शद नदीमला (Arshad Nadeem) सर्वोच्च नागरी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात अर्शद नदीमला हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या हस्ते दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 13 ऑगस्ट रोजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अर्शदला हिलाल-ए-इम्तियाज म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करून पाकिस्तानला सुवर्णपदक मिळवून दिले होते. या विजयासह त्याने पाकिस्तानचा तब्बल 4 दशकांपासून सुरू असलेला सुवर्णपदक जिंकण्याचा दुष्काळही संपवला.


मोठ्या प्रमाणात भेटवस्तूंची भेट- 


8 ऑगस्ट रोजी अर्शद नदीमच्या ऐतिहासिक विजयानंतर त्याच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सुवर्णपदक जिंकण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी नदीमसाठी जेवणाचे आयोजन केले होते आणि 15 कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी इस्लामाबादमधील जिना स्टेडियमच्या आत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्याचे नाव 'अर्शद नदीम' असेल. याशिवाय पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी नदीमला पाकिस्तानी चलनातील 10 कोटी रुपये आणि एक होंडा सिविक कार भेट दिली.


अर्शद नदीमच्या संपत्तीत वाढ-


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 ऑगस्ट 2024 पूर्वी म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी अर्शद नदीमची एकूण संपत्ती फक्त 80 लाख रुपये होती. तसेच अर्शद नदीमचे घर देखील मोडकळीस आले होते. एकेकाळी अर्शदकडे नवीन भाला घेण्यासाठीही पैसे नव्हते. पण आता तो श्रीमंत झाला आहे. अर्शद नदीमकडे आता 9 कार आणि 7 अपार्टमेंट असल्याचा दावा एका पाकिस्तानी व्यक्तीने सोशल मीडियावर केला आहे. तसेच अर्शद नदीमकडे आता जवळपास 47 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अर्शद नदीमने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 


अर्शद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड अन् सुवर्णपदक-


अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. अर्शद नदीमने 92.97 मीटर फेक केली होती. त्याच्या या थ्रोची ऑलिम्पिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक पटकावले.


अर्शद नदीमचा संघर्षमय प्रवास-


अर्शद नदीमचा पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ऑलिम्पिकपर्यंत पोहचण्यासाठी अर्शद नदीमला कठोर मेहनत करावी लागली. त्याचे वडील मजुरी करतात. नदीमसा प्रशिक्षण देण्यासाठी पैसेही उपलब्ध व्हावेत यासाठी गावातील लोकांनी वर्गणी काढून रक्कम जमा केली. 


संबंधित बातमी:


जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होताच पाकिस्तानची भाषा बदलली; खिलाडूवृत्तीचं उदाहरण देत भूमिका केली स्पष्ट!