पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महान टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच याचं गेली कित्येक वर्ष अपूर्ण असलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नोवाक जोकोविचनं पहिल्यांदा  लेकीला मिठी मारत विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी तिथं त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. नोवाक जोकोविचनं फायनलमध्ये कार्लोस अल्कराज याला पराभूत करत इतिहास रचला. 


नोवाक जोकोविचनं पुरुष एकेरी स्पर्धेत कार्लोस अल्कराजला 7-6, 7-6 अशा फरकानं पराभूत केलं. सर्बियाचा टेनिस खेळाडू असलेल्या नोवाक जोकोविचनं वयाच्या 37 व्या वर्षी सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला. 1988 नंतर 37 व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नोवाक जोकोविच हा पहिला खेळाडू ठरला. 


नोवाक जोकोविचनं आतापर्यंत 24 ग्रँड स्लॅम जिंकली होती.  नोवाक जोकोविच ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकासाठी प्रयत्न करत होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इटलीच्या लोरेंजो मुसेटी याला पराभूत करत त्यानं पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. नोवाक जोकोविचं गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. जोकोविचला बीजिंग ऑलिम्पिक (2008) मध्ये राफेल नदाल कडून पराभूत झाला होता. एंडी मरेनं  2012 च्या ऑलिम्पिकमध्ये जोकोविचला पराभूत केलं होतं. तर, 2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये   अॅलेक्झांडर ज्वेरेव यानं जोकोविचला पराभूत केलं होतं. जोकोविचनं 2008 मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. 


चार ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला गोल्डन स्लॅम मिळवणारे खेळाडू असं म्हटलं जातं. नोवाक जोकोविच पूर्वी स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांनी ही कामगिरी केली आहे. जर्मनीच्या स्टेफी ग्राफ यांनी पहिल्यांदा गोल्डन स्लॅमचा बहुमान मिळवला होता. त्यांनी 1988 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. 


जोकोविचनं अंतिम फेरीपूर्वी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. नोवाक जोकोविचनं अल्कराजला पराभूत करत विंम्बल्डनचा देखील बदला घेतला आहे. अल्कराजनं त्या स्पर्धेत जोकोविचला पराभूत केलं होतं. 


नोवाक जोकोविचचं संपूर्ण कुटुंब उपस्थित


नोवाक जोकोविचनं पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिल्यानं हा सामना पाहण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. दोन सेटमध्ये मॅच जिंकल्यानंतर जोकोविचनं मैदान आणि प्रेक्षकांना अभिवादन केलं. यानंतर त्यानं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लेकीकडे आणि कुटुंबाकडे जात त्यांची भेट घेतली. यावेळी जोकोविचनं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लेकीला मिठी मारली. हा बाप लेकीच्या आनंद साजरा करतानाचा फोटो अनेकांनी त्यांच्या फोनमध्ये टिपला. 


संबंधित बातम्या : 



 

सरपंच हरमनप्रीतनं करुन दाखवलं, द वॉल पीआर श्रीजेशची दमदार कामगिरी, ग्रेट ब्रिटनला पुन्हा लोळवलं